बिकट प्रसंगी साहित्य वाट दाखवते
By Admin | Updated: January 5, 2015 00:40 IST2015-01-04T19:51:31+5:302015-01-05T00:40:46+5:30
सुनीलकुमार लवटे : आप्पासाहेब पटवर्धन स्मृती व्याख्यानमाला

बिकट प्रसंगी साहित्य वाट दाखवते
कणकवली : शाळेतील शिक्षण साक्षर करते. तर साहित्य माणसाला समर्थ बनवते. जीवनातील बिकट प्रसंगात साहित्य वाट दाखवते, असे प्रतिपादन साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी केले. येथील नगर वाचनालयातर्फे आयोजित आप्पासाहेब पटवर्धन स्मृती व्याख्यानमालेतील ‘साहित्य आणि जीवन’ या विषयावर ते बोलत होते. व्याख्यानमालेचे उद्घाटन निवासी नायब तहसीलदार संतोष खरात यांनी केले. वाचनालयाचे अध्यक्ष वि. शं. पडते, कार्यवाह महेश काणेकर, मुख्याधिकारी अवधूत तावडे, ए. वाय. तानवडे यावेळी उपस्थित होते. प्रास्ताविक वि. शं. पडते यांनी केले.डॉ. लवटे पुढे म्हणाले की, साहित्य का वाचले जाते याचा विचार करा. जीवन जगण्यास साहित्य समर्थ बनवते. जीवनातील अनेक प्रसंग विविध साहित्यकृतींत डोकावतात. साहित्य हे अभिव्यक्तीचे साधन आहे. जेव्हा भाषा नव्हती तेव्हा माणूस तुलनेने बलवान होता. अभिव्यक्ती जशी वाढली तशी माणसाची शक्ती कमी झाली. साहित्य आपणास प्रगल्भ बनवते. मात्र, पोथीसारखे वाचनाने हाती काही लागणार नाही. अल्पाक्षरी लिहिणारे वाचकांवर जास्त प्रभाव टाकतात. ‘गीतांजली’पेक्षा रविंद्रनाथ टागोर यांच्या त्रिपदी प्रभावशाली आहेत. वि. स. खांडेकर यांची ताकद त्यांच्या रूपक कथांमध्ये पहावयास मिळते. शब्दप्रभू कवीला विविध भाव शब्दांत पकडण्याची कला अवगत असते. प्रतिभावान साहित्यकार जीवनाकडे सूक्ष्मपणे पाहत जगतो.
साहित्यकारांकडून नकारात्मक आणि सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त होतात. दलित साहित्य, स्त्रीवादी साहित्यातून नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त होताना पाहावयास मिळतात. दुसरीकडे स्वत: आयुष्यात अनेक यातना भोगूनही सकारात्मक लिहिणारा वर्ग आहे. संवेदनशील माणसांना जीवनाचे व्यवहार लागू होत नाहीत. साहित्यकार याच विश्वातले असतात. त्यांच्या संवेदनांना व्यवहाराची चौकट बसत नाही. संवेदनशील साहित्यकारांच्या कलाकृतीत जीवन चपखलपणे बसते. साहित्य हा जीवनाचा आरसा आहे, अशी व्याख्या केली जात असली तरी ते फोटोसारखे नाही. प्रतिभावान साहित्यकार जीवनाला प्रतिबिंबीत करतो. सच्चा लेखक फक्त व्यथा, वेदना मांडत नाही तर आपल्या साहित्यकृतीतून जीवन रसिकतेने प्रतिबिंबीत करतो, असेही डॉ. लवटे म्हणाले. प्रा. लालासाहेब घोरपडे यांनी सूत्रसंचालन केले.
आजकाल टीव्ही पाहणे सुखाचे झाले असून, व्याख्यान ऐकणे त्रासाचे झाले आहे. हे सांस्कृतिक अध:पतनाचे निदर्शक आहे.
- डॉ. सुनीलकुमार लवटे,
साहित्यिक.