तंटामुक्ती मनावर बिंबवणे गरजेचे
By Admin | Updated: December 25, 2014 00:12 IST2014-12-24T23:10:22+5:302014-12-25T00:12:34+5:30
जीवन कांबळे : ओंबळ येथे पारितोषिक वितरण समारंभ

तंटामुक्ती मनावर बिंबवणे गरजेचे
शिरगाव : गाव तंटामुक्त झाले म्हणजे आपली जबाबदारी संपली असे नाही तर ती आता खऱ्या अर्थाने वाढली आहे. तंटामुक्त गाव कसा ठेवायचा हे प्रत्येक ग्रामस्थांच्या मनावर बिंबवणे गरजेचे आहे. लोकसहभाग, सामोपचार व प्रशासनाचे सहकार्य घेऊन ओंबळ गाव तंटामुक्त झाला हे यश कौतुकास पात्र आहे, असे गौरवोद्गार देवगड तहसीलदार जीवन कांबळे यांनी ओंबळ येथे काढले.
ओंबळ ग्रामपंचायतीस सन २०१०-११ या कालावधीत महात्मा गांधी तंटामुक्त गावाचे शासनाचे पारितोषिक मिळाले होते. पारितोषिक वितरण समारंभ जीवन कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी योजनेची माहिती, तंटामुक्ती समितीची भूमिका, ग्रामस्थांचे सहकार्य व शासनाचा या योजनेविषयीच्या उद्देशाविषयी मार्गदर्शन केले.
व्यसनमुक्त कला, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात यश मिळविलेल्या ग्रामस्थांचा यावेळी सत्कार करण्यात आला. शिरगाव हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य विजयकुमार कदम सत्काराला उत्तर देताना म्हणाले, जननी, जन्मभूमी स्वर्गाहूनही श्रेष्ठ आहे. जन्मभूमीत माझ्या ग्रामस्थांनी केलेला सत्कार अवर्णनीय आहे.
ग्रामस्थांच्या एकजुटीच्या वज्रमुठीमुळेच गाव तंटामुक्त झाला. ही एकीची वज्रमुठ कायम ठेवा. स्पर्धा परीक्षांमध्येही गावच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवावे, यासाठी ध्येयासक्ती अनंत असावी. तंटामुक्ती समितीध्यक्ष राजनकुमार कदम म्हणाले, ग्रामस्थांच्या सहकार्यामुळेच तंटामुक्त समितीला हे नेत्रदीपक यश मिळाले, याचा सार्थ अभिमान वाटतो.
यावेळी सरपंच माधुरी ओंबळकर, तलाठी जे. एस. साईल, शामसुंदर जाधव, पोलीस पाटील संजय पवार, कृषीसेवक चित्रा सारंग, ग्रामपंचायत सदस्य सुरेश मेस्त्री, विरेंद्र पवार, प्रज्ञा पवार, ग्रामसेवक व्ही. एम. मलगुंडे, शिरगाव तंटामुक्त समिती अध्यक्ष मंगेश लोके, निमंत्रक चंद्रशेखर साटम, माजी सरपंच भालचंद्र धुमाळ, माजी पोलीस पाटील शरद पवार, विठ्ठल गावडे, अरूण पवार, अनिल पवार, सुप्रिया कदम, कामगार कल्याण अधिकारी प्रभाकर जाधव, नाद पोलीस पाटील विजय तांबे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन संभाजी पाटील यांनी केले. आभार राजन कदम यांनी मानले. (प्रतिनिधी)