बुरूड व्यवसायाला उतरती कळा

By Admin | Updated: November 28, 2014 23:55 IST2014-11-28T21:48:15+5:302014-11-28T23:55:51+5:30

प्रयत्न हवेत : शासनाचा यासाठीचा पुढाकार अत्यंत गरजेचा

Dismantling the Burug Business | बुरूड व्यवसायाला उतरती कळा

बुरूड व्यवसायाला उतरती कळा

श्रीकांत चाळके - खेड -औद्योगिकीकरण व आधुनिक युगामध्ये भारतीय संस्कृतीमधील १२ बलुतेदारांपैकी बुरूड व्यवसायाला विविध कारणांने आता उतरती कळा लागली आहे. पोट भरण्यासाठी या समाजावर आता लाकडाची मोळी विकण्याची वेळ आली असून, अत्याधुनिक तंत्रज्ञानांनी तयार करण्यात येत असलेल्या अवजांरामुळे हा उद्योग अडचणीत आला आहे़ याकरिता शासनाने पुढाकार घेऊनच या व्यवसायाच्या तेजीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे़
शेती लागवडीखालील क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत असल्याने शेतकरी ही संकल्पना केवळ कागदोपत्रीच राहणार की काय असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होत आहे़ भात धान्य साठविण्यासाठी लागणारी टोपली, सुपं, चाळणी, वेतापासून बनविण्यात येणा-या वस्तु शेतकरी मोठ्या प्रमाणात वापरतात़ या सर्व वस्तूु बांबूच्या सहाय्याने तयार करण्यात येत असल्याने बांबुच्या वाढलेल्या दराचा परिणाम या वस्तुंच्या दरावर होत आहे़ बांबूच्या या वस्तूंच्या दरात सध्या प्लॅस्टीकच्या वस्तु किंमतीत स्वस्त असल्याने या व्यवसायावर अनिष्ट परीणाम झाला आहे़ विशेष म्हणजे प्लास्टीकच्या वस्तू वापरणे सोयीचे आणि कमी खर्चाचे असल्याने त्यांना बाजारात मागणी आहे. याउलट बांबुंचे वाढते दर आणि अव्वाच्यासव्वा मजुरीचे दर यामुळे हा व्यवसायच धोक्यात आला आहे. शेती पिकवणा-या शेतक-यांची संख्या कमी झाल्याने वेतांच्या वस्तूची मागणी घटली़ तर दुसरीकडे प्लास्टीकचे आक्रमण झाल्याने या वस्तू इतिहास जमा होऊ लागल्या आहेत.
बांबू व वेताची किंमती वाढल्या़ वस्तुंच्या किमतीपेक्षा जास्त मेहनत पडत असल्याने सध्या भूक भागविणे कठिण झाले असल्याने बुरूड व्यवसाय धोक्यात आला आहे. काहींनी आपला पारंपारिक व्यवसायही बंद केला आहे़ त्यामुळें उपासमारीची वेळ आली आहे़ मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवावे लागत आहे़ तर काहींनी वडीलोपार्जित धंदा म्हणून सुरू ठेवला आहे़ अशातच बांबुंची कमतरता आणि चढत्या किमती या साऱ्या भोवऱ्यात बुरूड व्यवसाय लोप पावला आहे़ याकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा बुरूड समाजाची आहे़ या समाजाला न्याय मिळाल्यास या व्यवसायाला उर्जितावस्था प्राप्त होईल़
खादी ग्राम उद्योगाने या व्यवसायाला संरक्षण देणे आवश्यक आहे़ खादीच्या अनेक योजना या व्यवसायाला पूरक आहेत़ विशेष सवलतीही दिल्या जात आहेत. मात्र घेतलेल्या कर्जाचा विनियोग केला जात नसल्याची ओरड आहे़ खादी ग्रामोद्योगकडून कर्ज घेताना अनेकांना मध्यस्थांची मदत घ्यावी लागत आहे. अज्ञानामुळे हे अनेकवेळा घडते़ त्याकरिता त्यांना मध्यस्थांना काही पैसे किंवा टक्केवारीही मोजावी लागल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे कर्जाची परतफेड करताना या व्यावसायिकांना अडचणी येतात. या व्यवसायाला उत्तेजन देण्यासाठी राज्य सरकारने ठोस कृती केल्यास थेट या व्यावसायिकालाच कमी दराने कर्जपुरवठा होऊ शकेल आणि यातूनच या आधुनिक तंत्रज्ञानाने तयार करण्यात येत असलेल्या वस्तुंच्या बाजारपेठेत बुरूड व्यवसाय टिकून राहू शकेल.


पाठपुरावा करण्यासाठी वाली नाही..
भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व असलेल्या बारा बलुतेदारांपैकी बुरूड समाज आज संक्रमण अवस्थतेतून जात आहे. या समाजातील तरूणांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. शासनाने पुढाकार घेऊन या व्यवसायाला आता उर्जितावस्था येणे आवश्यक आहे. याचा पाठपुरावा कोण करणार असा प्रश्न विचारला जात आहे.


पाठपुरावा करण्यासाठी वाली नाही..
भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व असलेल्या बारा बलुतेदारांपैकी बुरूड समाज आज संक्रमण अवस्थतेतून जात आहे. या समाजातील तरूणांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. शासनाने पुढाकार घेऊन या व्यवसायाला आता उर्जितावस्था येणे आवश्यक आहे. याचा पाठपुरावा कोण करणार असा प्रश्न विचारला जात आहे.

Web Title: Dismantling the Burug Business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.