आचऱ्याचा दसरोत्सव अपूर्व उत्साहात
By Admin | Updated: October 24, 2015 00:43 IST2015-10-23T21:20:14+5:302015-10-24T00:43:48+5:30
शाही थाट : भाविकांची सोने लुटण्यासाठी गर्दी

आचऱ्याचा दसरोत्सव अपूर्व उत्साहात
आचरा : संस्थानी थाटाकरिता प्रसिद्ध असलेल्या इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानचा दसरोत्सव शाही थाटात पार पडला. सायंकाळच्या सुमारास इनामदार श्री देव रामेश्वर मंदिरानजीकच्या रवळनाथ मंदिरातून तोफांच्या आतषबाजीनंतर श्रींची स्वारी आचरा बाजारपेठ येथील श्री देवी फुरसाई मंदिर येथे महालदार, चोपदार, अबदागीर, निशाण, मानकरी, देवसेवक, आदींच्या समवेत शाही लवाजम्यांसह प्रस्थान झाली. श्री देवी फुरसाई मंदिराच्या प्रांगणात ‘श्रीं’च्या स्वारीचे शिवलग्न लावण्यात आले. यानंतर येथे उपस्थित असलेल्या भाविकांनी आपट्याची पाने सोने म्हणून लुटली.रामेश्वराच्या या प्रसिद्ध दसरोत्सवाकरिता बेळगाव, गोकर्ण, गोवा, मुंबई, पुणे, कोल्हापूर, आदी भागांमधून आचरा गावचे मूळ रहिवासी आचरेकर उपस्थित होते. श्री देव रामेश्वराला दसऱ्यानिमित्त पंचमुखी महादेवाच्या रुपात अलंकृत करण्यात आले होते. श्री रामेश्वराचे हे पंचमुखी महादेवाचे रूप भाविकांना वर्षभरामधून कार्तिक पौर्णिमा, दसरा व गुढीपाडवा या तीनच दिवशी पाहावयास मिळत असल्याने दुपारपासून श्री देव रामेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती. श्री देवी फुरसाई मंदिरातही माहेरवाशिणींनी श्री देवीची ओटी भरण्याकरिता गर्दी केली होती.
रात्री श्री देव रवळनाथ मंदिर येथे श्रींच्या स्वारीसमोर श्रींच्या दरबारात अनेक भाविकांनी आपली हजेरी लावून आपले गाऱ्हाणे मांडले. यावेळी श्री रामेश्वर संस्थानचे अध्यक्ष मिलिंद मिराशी, वहिवाटदार प्रदीप मिराशी, राजू मिराशी, ऋषिकेश मिराशी व इतर बारापाच मानकरी व देवसेवक उपस्थित होते. (वार्ताहर)