गैरसोयीच्या मतदान केंद्रांमुळे नाराजी
By Admin | Updated: September 21, 2014 00:25 IST2014-09-21T00:25:00+5:302014-09-21T00:25:00+5:30
माडखोल येथील प्रकार

गैरसोयीच्या मतदान केंद्रांमुळे नाराजी
सावंतवाडी : सुमारे २५०० मतदार असलेल्या माडखोल गावात तीन मतदान केंद्रे आहेत. परंतु या प्रत्येक मतदान केंद्राला त्याच्या जवळच्या वाड्या जोडण्याचे सोेडून दुसऱ्या मतदार केंद्राजवळील सुमारे अडीच ते तीन किलोमीटर अंतरावरील वाड्या जोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांसाठी हे गैरसोयीचे झाले आहे. मतदान केंद्रावर जाण्यासाठी यावेळी नागरिकांना संपूर्ण गावाला वळसा घालून जावे लागणार असल्यामुळे याबाबत ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे.
या गावातील मतदान केंद्र क्र. १०४ ला जवळ असलेल्या देऊळवाडी, मधलीवाडी, हरिजनवाडी, घाडीवाडी, ठाकूरवाडी, फुगीवाडी, गवळीवाडी, रेवकोंडवाडी या वाड्या अडीच ते तीन किमी अंतरावरील मतदान केंद्र १०२, १०३ ला जोडण्यात आल्या. तसेच मतदान केंद्र १०२ ला जवळ असलेली वरकोंडवाडी मतदान केंद्र १०३ ला जोडण्यात आली. तर मतदान केंद्र १०३ ला जवळ असलेली मेटवाडी मतदान केंद्र १०२ ला जोडण्यात आली. निवडणूक यंत्रणेच्या या चुकीच्या नियोजनामुळे जवळ मतदान केंद्र असूनही तीन किमी अंतरावरील मतदार केंद्रावर जाऊन मतदारांना मतदानाचा हक्क बजवावा लागतो.
ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे मतदान केंद्र १०२ मध्ये वरकोंडवाडी, बेबीवाडी, वरची व खालची धवडकी, धुरीचावाडा समावेश करावा. मतदान केंद्र १०३ मध्ये मेटवाडी, देसाईवाडी, धनगरवाडी, गोठणवाडी, तामळवाडीचा सामावेश करावा. तर मतदान केंद्र १०४ मध्ये डुंगेवाडी, सुतारवाडी, हरिजनवाडी, गवळीवाडी, रेवकोंडवाडी, घाडीवाडी, ठाकूरवाडी या वाड्यांचा सामावेश करावा. याबाबत माडखोल ग्रामसभेत ठराव करून पाठविण्यात आला आहे. परंतु याची योग्य ती दखल घेण्यात आली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, याबाबत गावचे तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष विजय राऊळ, किशोर सौंदेकर, वासुदेव होडावडेकर, आनंद राऊळ आदींनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधून त्वरित कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात ग्रामसभेत ठराव झाल्याप्रमाणे मतदान केंद्राच्या जवळपासच्या वाड्यात मतदान केंद्रात सामाविष्ट कराव्या जेणेकरून त्यामुळे मतदारांची गैरसोय दूर होईल, असे म्हटले आहे.
ग्रामस्थांच्या या मागणीचा प्रशासनाने योग्य तो विचार करावा आणि त्यांची समस्या सोडवावी, अशी मागणीदेखील या ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाकडे केली
आहे. (वार्ताहर)