चौपदरीकरणाबाबत व्यापाऱ्यांमध्ये मतभेद
By Admin | Updated: August 22, 2014 22:57 IST2014-08-22T22:51:06+5:302014-08-22T22:57:44+5:30
कणकवलीत व्यापाऱ्यांची बैठक : विस्थापितांना सहकार्य करण्याचा निर्णय

चौपदरीकरणाबाबत व्यापाऱ्यांमध्ये मतभेद
कणकवली : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग हा कणकवली शहरातूनच जाणे आवश्यक आहे, असे मत काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केले. तर महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी बायपास हाच योग्य पर्याय आहे, असे काही व्यापाऱ्यांचे म्हणणे असल्याने महामार्ग चौपदरीकरणाबाबतच्या व्यापाऱ्यांच्या बैठकीत मतभिन्नता दिसून आली. मात्र, या महामार्गामुळे विस्थापित होणाऱ्या व्यापाऱ्यांना सर्वांनी सहकार्य करण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला.
येथील नगरवाचनालयाच्या पू. आप्पासाहेब पटवर्धन सभागृहात कणकवली शहरातील व्यापाऱ्यांची बैठक झाली. यावेळी उदय वरवडेकर, विलास कोरगांवकर, जयेश धुमाळे, डॉ. चंद्रकांत राणे, बाबू वळंजू, अॅड. विलास परब, व्यापारी संघाचे महेश नार्वेकर, बंडू खोत, नगरसेवक कन्हैय्या पारकर, अनिल मांजरेकर, माळवदे आदी व्यापारी उपस्थित होते.
यावेळी अनेक व्यापाऱ्यांनी आपली मते मांडली. महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे जे व्यावसायिक विस्थापित होणार आहेत त्यांनी शहराबाहेरून हा मार्ग नेण्यात यावा अशी आपली भूमिका स्पष्ट केली तर काही व्यापाऱ्यांनी शहरातूनच महामार्गाचे चौपदरीकरण व्हावे अशी आपली भूमिका मांडली. बाजारपेठेमधून ओव्हरब्रीज किंवा बॉक्सेल रोड व्हावा याबाबतही बराचवेळ चर्चा करण्यात आली. शहरातून ओव्हरब्रीज झाला तर शहरातील व्यवसायावर परिणाम होणार आहे.
नव्या कायद्यानुसार या महामार्गासाठी भूसंपादन होणार असल्याने बाजारभावाच्या अनेकपटीने नुकसान भरपाई व्यापाऱ्यांना मिळेल. अनेक प्रकल्पांमध्ये विस्थापित झालेले शेतकरी, घरांचे मालक यांचे विस्थापन शासनाकडून होते. मात्र व्यापाऱ्यांच्या विस्थापनाबाबत कोणतीही तरतूद नसल्याची माहिती अॅड. विलास परब यांनी यावेळी दिली.
कणकवली शहराबाहेरून राष्ट्रीय महामार्ग गेला तर शहरातील हॉटेल, लॉजिंग व्यवसायावर मोठा परिणाम होईल अशी भिती बाबू वळंजू यांनी व्यक्त केली.
चौपदरीकरण महामार्गाच्या लगत दुकाने वसवता येत नाहीत. काही अंतर आणि सर्व्हिस रस्ता असेल तरच दुकाने मांडता येतात. त्यामुळे चौपदरीकरण शहरातून झाले किंवा शहराबाहेरून झाले तरी त्याचा व्यवसायावर फारसा परिणाम होत नसल्याचे यावेळी अनेक व्यापाऱ्यांनी सांगितले. बाजारपेठांमधील व्यापार, विकास आणि महामार्ग चौपदरीकरण यांचा फारसा संबंध नाही अशी भूमिका जयेश धुमाळे यांनी मांडली. महामार्ग चौपदरीकरणाबाबत अनेक व्यापाऱ्यांनी विविध मुद्दे मांडले. मात्र या बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नाही. (वार्ताहर)