जिल्ह्यात १४८ बालकांना अतिसार
By Admin | Updated: August 14, 2014 00:05 IST2014-08-13T23:53:39+5:302014-08-14T00:05:52+5:30
नियंत्रण सप्ताह सर्वेक्षण कार्यक्रमात माहिती उघड

जिल्ह्यात १४८ बालकांना अतिसार
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत २८ जुलै ते २ आॅगस्ट या कालावधित राबविण्यात आलेल्या अतिसार नियंत्रण आठवड्यामध्ये जिल्ह्यात १४८ बालके अतिसाराची लागण झालेली आढळली. त्यांना ओ.आर.एस.पावडर वितरित करण्यात आली असल्याची माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली.
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार पाच वर्षांखालील मुलांना होणारी अतिसाराची साथ रोखण्यासाठी २८ जुलै ते २ आॅगस्ट या कालावधित अतिसार नियंत्रण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहामध्ये जिल्ह्यातील ‘आशा’ कर्मचारी आणि आरोग्यसेविका यांच्यामार्फत पाच वर्षांखालील अतिसाराची लागण झालेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांना ओ.आर.एस. पावडर (पाकीट) वितरित करण्याचा आणि वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन करण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
जिल्ह्यातील पाच वर्षांखालील एकूण ४८ हजार ७१५ बालकांपैकी २८ हजार ५२१ बालकांमध्ये अशक्तपणा जाणवला, तर त्यामध्ये १४८ एवढ्या बालकांना अतिसाराची लागण झाल्याचे आढळून आले. त्यापैकी १२ मुले अतिसाराने गंभीर आजारी आढळली. या सर्व बालकांवर तत्काळ
औषधोपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. तसेच दोन महिने ते सहा महिने वयाच्या सर्व बालकांना ‘झिंक’ या रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या गोळ्यांचा डोस पुरविण्यात आला.
अतिसार नियंत्रण सप्ताह अभियानामध्ये जिल्ह्यातील ७९२ आशा स्वयंसेविका, ३७८ आरोग्य सेवक-सेविका आणि ८० स्टाफ नर्स, आदींनी काम केले. त्याचप्रमाणे ४ ते ८ आॅगस्ट या कालावधित स्तनपान सप्ताहाचे आयोजन करून जिल्ह्यातील २८ हजार १७७ कुटुंबांना भेटी देऊन १०९६ ठिकाणी स्तनपानाबाबतचे समुपदेशन करण्यात आले.
या कालावधित जिल्ह्यात ८५ बालकांचा जन्म झाला. या सर्व बालकांना जन्मत:च एका तासात स्तनपान करण्यात आले. याबाबतचे समुपदेशन संबंधित मातांना करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागामार्फत देण्यात आली. यापुढे टप्प्याटप्प्याने स्तनपान सप्ताह आणि अतिसार नियंत्रण सप्ताह आयोजित करून लहान मुलांना होणारा अतिसाराचा आजार रोखण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. (प्रतिनिधी)