धनंजय शिरोडकरांचा जनआंदोलनाचा इशारा
By Admin | Updated: September 11, 2014 00:01 IST2014-09-10T22:27:33+5:302014-09-11T00:01:20+5:30
सातार्डा तपासणी नाक्यावर असभ्य वागणूक

धनंजय शिरोडकरांचा जनआंदोलनाचा इशारा
शिरोडा : महाराष्ट्र- गोवा सीमेवरील सातार्डा चेक पोस्टवर पोलिसांकडून जनतेशी असभ्य व्यवहार होत आहे. मनसेचे शिरोडा शाखाध्यक्ष धनंजय शिरोडकर यांनाही पोलिसांच्या असभ्य वर्तनाची झलक पहावयास मिळाल्याने त्यांनी या पोलिसांकडून जनतेला योग्य वागणूक न मिळाल्यास जनआंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.
याबाबत धनंजय शिरोडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, धनंजय शिरोडकर व त्यांचा मित्र स्वप्निल कुडव काम करत असलेल्या गोवा येथील कंपनीतून रात्री माघारी येत असता, सातार्डा चेक पोस्टवर थांबा घातलेला असल्याने मोटारसायकल थांबविली. यावेळी रात्रपाळीसाठी असलेला पोलीस कर्मचारी त्या दोघांना उद्देशून असभ्य भाषेत बोलत होता. शिरोडकर यांनी पोलीस कर्मचाऱ्यांकडे लक्ष न देता थांबा वर करण्याची विनंती केली. परंतु तो पोलीस कर्मचारी जास्तच अडवणूक करू लागला. त्यानंतर बऱ्याचवेळाने त्याने थांबा वर केला.
जनतेच्या रक्षणासाठी व संरक्षणासाठी असणाऱ्या पोलिसांकडून जनता चांगल्या वागण्याची अपेक्षा करते. मात्र, काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या असभ्य वागण्याने जनता पोलिसांना नावे ठेवत आहे. अशा पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे असल्याचे शिरोडा मनसेचे शाखाध्यक्ष धनंजय शिरोडकर यांनी सांगतानाच सातार्डा चेकपोस्टवर सीसीटीव्ही लावण्याची मागणी केली आहे.
तसेच पोलिसांच्या असभ्य वर्तणुकीला वेळीच न रोखल्यास जनआंदोलन उभारण्याचा इशाराही दिला आहे. (प्रतिनिधी)
तपासणी नाक्यांवर खाकीकडून दमदाटी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या तपासणी नाक्यांवरील काही कर्मचारी हे प्रवाशांबरोबर अशाप्रकारचे असभ्य वर्तन करत असल्याच्या घटना वारंवार उघड होत आहेत. मात्र, त्या -त्यावेळी प्रवाशी याबाबत आवाज उठवत नाहीत. त्यामुळे खाकीमधील अशा काही कर्मचाऱ्यांमुळे पूर्ण वर्दीची प्रतिमा डागाळत आहे, असे मत प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.