‘सी वर्ल्ड’ प्रकल्पासाठी देवगडवासीय सरसावले
By Admin | Updated: January 2, 2015 00:24 IST2015-01-01T21:32:18+5:302015-01-02T00:24:13+5:30
स्वाक्षरी मोहीम : फें्रड्स सर्कलचा पुढाकार

‘सी वर्ल्ड’ प्रकल्पासाठी देवगडवासीय सरसावले
देवगड : मालवण तोंडवळी येथे होणारा सी-वर्ल्ड प्रकल्प अन्यत्र हलविण्याच्या संदर्भात आमदार नीतेश राणे यांनी सूतोवाच केल्यानंतर देवगड येथील फ्रेंड्स सर्कल या संस्थेने हा प्रकल्प देवगड येथे होण्यासाठी स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन केले आहे.
बुधवारी सकाळी ११ वाजता देवगड शहर विकास आघाडीचे अध्यक्ष निशिकांत साटम यांच्या हस्ते या स्वाक्षरी मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी देवगडमधील विविध संस्थांच्या अध्यक्षांनी व प्रतिष्ठित नागरिकांनी या प्रकल्पाच्या समर्थनार्थ स्वाक्षऱ्या करून या संदर्भात फ्रेंड्स सर्कल करीत असलेल्या कामाला शुभेच्छा दिल्या. या अभियानामध्ये देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष हनीफ मेमन, व्यापारी संघाचे उपाध्यक्ष मधुकर नलावडे, तारामुंबरी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष धर्मराज जोशी, आंबा बागायतदार संघटनेचे सुधीर जोशी, डॉ. सुनील आठवले, विवेक नलावडे, प्रमोद नलावडे, सुषमा देसाई आदी उपस्थित होते.
फ्रेंड्स सर्कल या संस्थेतर्फे पुढील काही दिवसांत दहा हजारांहून अधिक स्वाक्षऱ्यांची यादी आमदारांना देण्याचा संकल्प केला आहे. यासाठी मंडळाचे सर्व सभासद गावोगावी मोहिम राबवणार आहेत. यात देवगडमवासीयांनी प्रकल्प समर्थनार्थ मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन फ्रेंड्स सर्कलने केले आहे. (वार्ताहर)