देवगड पोलीस ठाण्याची इमारत मोडकळीस
By Admin | Updated: January 8, 2015 00:04 IST2015-01-07T20:50:47+5:302015-01-08T00:04:01+5:30
दरवर्षी डागडुजी : कर्मचारीच सोसतात आर्थिक भुर्दंड; इमारतीच्या नूतनीकरणाची मागणी

देवगड पोलीस ठाण्याची इमारत मोडकळीस
योगेश तेली राणे - देवगड तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करणाऱ्या देवगड पोलीस स्टेशनची इमारत जीर्ण झाली आहे. या निवासी इमारतीची पुनर्बांधणी करण्याची आवश्यकता आहे. या इमारतीत राहणारे कर्मचारीच इमारतीची डागडुजी करून रहात आहेत. पावसाळ्यात तर कौलांमधून पाण्याच्या धाराच वाहू लागतात. प्लास्टिकचे कागद बांधून पाण्याच्या धारा बंद कराव्या लागतात. दरवर्षी डागडुजी करून आर्थिक भुर्दंड सोसूनही कायमस्वरूपी त्यावर योग्य अशी कार्यवाही होत नसल्याने हा त्रास येथील पोलीस कर्मचाऱ्यांना सहन करावा लागतो.
पोलिसांची राहण्याची सोय व्यवस्थित नसल्याने पोलिसांना त्रास सहन करावा लागत आहे. पोलीस यंत्रणेला २४ तास आॅन ड्युटी करावी लागते. येथे रहात असलेल्या पोलिसांच्या घरांची दारे व खिडक्या मोडकळीस आल्या आहेत.
तालुक्यातील देवगड पोलीस स्टेशन महत्त्वाचे आहे. मात्र, निवासी वापरासाठी सुसज्ज व सोयीनियुक्त इमारतीची व्यवस्था केल्यास पोलिसांची कार्यक्षमताही वाढणार आहे. पोलीस स्टेशनअंतर्गत काही महत्त्वाच्या कार्यक्रमांवेळी बाहेरून पोलीस येत असतात. मात्र, त्यांच्या राहण्याची येथे गैरसोय होत असल्याने त्यांना कामाबाबत दक्ष राहणे शक्य होत नाही.
देवगड पोलीस स्टेशनची जीर्ण इमारत नूतनीकरण करून पोलिसांच्या निवासी सोयीसुविधा पूर्ण व्हाव्यात जेणेकरून तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य सरकारच्या माध्यमातून पूर्ण व्हावे, अशी मागणी पोलीस कर्मचाऱ्यांमधून होत आहे.
सोयी-सुविधांकडे दुर्लक्ष
या इमारतीची डागडुजी नियमित होत नसल्याने स्थानिक
पोलिसांनाच याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तालुक्यातील
इतर कार्यालये सुस्थितीत व नव्या इमारतीत असल्याने पोलीस स्टेशनसारख्या कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या यंत्रणेलाही सर्वसोयींनीयुक्त निवासी इमारतीची गरज आहे.
बंद इमारतीची दुरूस्ती गरजेची
जुन्या पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस असलेली नादुरुस्त निवासी इमारत पूर्णत: बंद अवस्थेत आहे. हीच इमारत व्यवस्थित केली तर पोलिसांच्या निवासाचा प्रश्न सुटणार आहे. या जीर्ण इमारतीतच पोलीस ठाण्याचा गणपतीही विराजमान होतो.