देवगड पंचायत समितीचे कार्य कौतुकास्पद
By Admin | Updated: August 4, 2015 00:09 IST2015-08-03T22:33:36+5:302015-08-04T00:09:54+5:30
शेखर सिंह : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी साधला कर्मचाऱ्यांशी संवाद

देवगड पंचायत समितीचे कार्य कौतुकास्पद
देवगड : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मी सर्वप्रथम भेट दिलेली पहिली पंचायत समिती देवगड ही आहे. देवगड पंचायत समितीने विविध योजना, अभियाने राबविण्यात जिल्ह्यात, कोकण विभागात किंबहुना राज्यात अव्वल स्थानावर राहण्याची सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंग यांनी केले.राज्याच्या ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव व्ही. गिरिराज यांच्या कुणकेश्वर दौऱ्यानिमित्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंग कुणकेश्वर येथे आले होते. यावेळी त्यांनी देवगड पंचायत समितीला भेट देऊन अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी विजय चव्हाण, सहायक गटविकास अधिकारी शारदा नाडेकर, उपअभियंता मोहिते, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी घोगरे, तालुका आरोग्य अधिकारी कोंडके, गटशिक्षणाधिकारी निसार नदाफ, विस्तार अधिकारी आर. एस. शिंदे, आदी अधिकारी, कर्मचारी व ग्रामसेवक उपस्थित होते.
गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंग यांचे स्वागत केले. तसेच ग्रामसेवक संघटनेच्यावतीने तालुका अध्यक्ष आर. एल. साटम व उपसचिव मंगेश साळसकर यांनीही त्यांचे स्वागत केले. देवगड पंचायत समितीच्या यशाची उज्ज्वल परंपरा आम्ही कायम राखू, अशी ग्वाही गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त करताना दिली. (प्रतिनिधी)
यशाची परंपरा कायम राखा
देवगड पंचायत समिती यशवंत पंचायत राज अभियानात राज्यात सलग तीन वेळा प्रथम आली आहे. पर्यावरण विकासरत्न पुरस्कार मिळवणारी ती राज्यातील एकमेव पंचायत समिती ठरली होती. राज्यातील पहिली आय.एस.ओ. मानांकनप्राप्त, १०० टक्के कुपोषणमुक्त अभियान राबविणारी, लोकराज्य ग्राम राबविणारी त्याचप्रमाणे रोजगार हमी योजनेतदेखील कोकण विभागात सर्वोत्कृष्ट काम करत गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विविध योजना नुसत्याच राबविल्या नाहीत, तर यशस्वी करून दाखविल्या आहेत. यशाची हीच परंपरा व सातत्य आपण सर्वांनी कायम राखा, असे आवाहन केले.