देवगड किनारा पर्यटकमय सुट्टीचा हंगाम : विविध भागातून पर्यटक दाखल, अधिक सुविधांची गरज
By Admin | Updated: May 18, 2014 00:25 IST2014-05-18T00:23:15+5:302014-05-18T00:25:30+5:30
नरेंद्र बोडस ल्ल देवगड देवगड पुळण म्हणजेच देवगडचा समुद्रकिनारा लांबीने जास्त नसला तरी अत्यंत आकर्षक आहे. एका बाजूला पवनचक्की व

देवगड किनारा पर्यटकमय सुट्टीचा हंगाम : विविध भागातून पर्यटक दाखल, अधिक सुविधांची गरज
नरेंद्र बोडस ल्ल देवगड देवगड पुळण म्हणजेच देवगडचा समुद्रकिनारा लांबीने जास्त नसला तरी अत्यंत आकर्षक आहे. एका बाजूला पवनचक्की व त्याठिकाणी जाण्यासाठी खास बनवलेली रुंद घाटी व दुसर्या बाजूला देवगड बंदर, देवगड किल्ला व गणेश मंदिर याखेरीज राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे व अत्याधुनिक असे रडार व त्यावरील संवेदनक्षम व प्रभावी कॅमेरा यंत्रणा अशा नैसर्गिक व मानवनिर्मित गोष्टींनी ही पुळण अक्षरश: हजारो पर्यटकांनी या हंगामात फुलून गेलेली आहे. देवगडमध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे एकावेळी ५० ते १०० पर्यटकांची एकाच ठिकाणी राहण्याची सोय नसणे ही आहे. त्यामुळे एक बस भरून आलेले पर्यटक खिरापतीसारखे ठिकठिकाणी वाटून त्यांची राहण्याची व जेवणाची सोय करावी लागते. त्यासाठी एकाच निवासी संकुलाने २५ ते ३० खोल्यांची सोय असणारी किमान तीन ते चार निवासी संकुले असणे अत्यंत गरजेचे आहे. या सुविधेअभावी पर्यटक मोठ्या बसेस घेऊन येथे येतात. परंतु राहण्यासाठी व रात्रीच्या मुक्कामासाठी त्यांना कणकवली, मालवण, ओरोस, कुडाळ आदी ठिकाणी जावे लागते. त्यामुळे या क्षेत्रात व निवासी संकुले व त्यामधील खोल्यांची संख्या यामध्ये भरीव गुंतवणूक खासगी तत्वावर त्याचप्रमाणे एमटीडीसीच्या माध्यमातून सरकारी यंत्रणेद्वारेही होणे आवश्यक आहे. सध्या कातवण येथे एमटीडीसीचे ३७ खोल्यांचे संकुल अजूनही प्रलंबित आहे. बांधकामही पूर्ण झालेले नाही. निधीअभावी हे काम रखडलेले आहे. त्यामध्ये सुधारणा होऊन हे काम तातडीने पूर्ण होणे आवश्यक आहे. देवगड किनार्यावर खासगी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून बसण्यासाठी चांगली मजबूत व आकर्षक आसन व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांची पसंतीही सूर्यास्तसमयी या ठिकाणी हजेरी लावण्यासाठी मिळत आहे. याठिकाणी ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषद प्रशासनाच्या माध्यमातून तात्पुरती खानपानसेवा देणारी शेड किंवा स्टॉल उभारून पर्यटकांना चांगली सेवा देऊ शकेल व त्यामुळे वर्दळही वाढू शकेल. याठिकाणी स्मशान असल्याने त्याभोवती मोठी भिंत बांधून दिल्याने बहुतेक पर्यटकांसाठी एक मानसिक आश्वासतेचे आहे. याठिकाणीच पर्यटन महोत्सवाचे आयोजन होते. त्यामुळे लोकांचे हे आकर्षण स्थान या आधीच बनलेले आहे. आता पायाभूत सुविधांअंतर्गत सुलभ शौचालय व विश्रांतीस्थान यांची गरज अजूनही पूर्ण झालेली नाही. पाण्याची व्यवस्था व सुलभ शौचालय यांची निर्मिती यामुळे पर्यटकांची संख्या अधिक वाढण्याची शक्यता आहे. देवगड पुळणीभोवती फिरून पुन्हा साटमवाडीमार्गे मुख्य रस्त्यावर येणारा रस्ता उपलब्ध झाल्याने पर्यटकांच्या आकर्षणात भर पडलेली आहे व त्याचा फायदा पुढील काळात दिसणार आहे.