पर्यटन विकासासाठी नवनवीन संकल्पना राबवणार
By Admin | Updated: May 6, 2015 00:18 IST2015-05-05T22:07:24+5:302015-05-06T00:18:27+5:30
सुभाष देसाई : रत्नागिरी पर्यटन महोत्सवाची उत्साहात सांगता

पर्यटन विकासासाठी नवनवीन संकल्पना राबवणार
रत्नागिरी : कोकण हा सर्वांचाच आवडता प्रदेश आहे, निसर्ग, देवदेवता यांच्यासाठी प्रसिध्द असा प्रदेश असणाऱ्या कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यात लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी समन्वयाने काम केल्यास चांगले काम होऊ शकेल. कोकणाच्या पर्यटन विकासाच्या धोरणात यापुढील काळात पर्यटनवृद्धीसाठीच्या नवनवीन संकल्पना राबविण्यात येतील, असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले. येथे गोगटे महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित रत्नागिरी पर्यटन महोत्सवाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री रवींद्र वायकर, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, रत्नागिरीचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, सभापती प्रकाश साळवी उपस्थित होते. महोत्सव यशस्वी केल्याबद्दल लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांचे कौतुक करुन देसाई म्हणाले की, महोत्सवाची ही परंपरा अशीच अखंडितपणे सुरू राहायला हवी. यामुळेच पर्यटन वाढून जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल.
पालकमंत्री वायकर म्हणाले, जिल्ह्याला लाभलेला समुद्रकिनारा पर्यटनदृष्ट्या विकसित करुन पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळू शकतो. यासाठी पर्यटन महोत्सवासारखे पूरक उपक्रम जिल्हा पातळीप्रमाणे तालुक्याच्या ठिकाणीही आयोजित करण्याचा प्रयत्न राहणार आहे. पर्यटन महोत्सव दरवर्षी चालू राहणार आहे. जिल्ह्याचा पर्यटनदृष्टीने विकास हाच आपला संकल्प असून पर्यटन आराखड्यासाठी पाठपुरावा करुन त्या माध्यमातून आवश्यक निधी प्राप्त करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. राधाकृष्णन बी. यांनी आयोजनासाठी सर्वांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.
यावेळी पाककला स्पर्धेतील विजेत्यांना आणि कलागुण सादर करणाऱ्या स्थानिक कलावंतांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच महोत्सवासाठी सहकार्य करणाऱ्या विविध स्वयंसेवी, खासगी संस्था आणि व्यक्तिंचा सन्मान करण्यात आला. (प्रतिनिधी)