आणखी दोघांवर अटकेची कारवाई

By Admin | Updated: September 11, 2014 23:10 IST2014-09-11T21:37:35+5:302014-09-11T23:10:53+5:30

कणकवली शहरासह परिसरातील घरफोडी प्रकरण

Detention of two of the accused | आणखी दोघांवर अटकेची कारवाई

आणखी दोघांवर अटकेची कारवाई

कणकवली : कणकवली शहरासह परिसरात घरफोडीसह चोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी आणखी एका युवकाला अटक केली आहे. तर चोरीचा माल विकत घेतल्याप्रकरणी शहरातील हॉटेल कालवणचे मालक देवेंद्र अनंत चिंदरकर (वय ३५) यांनाही अटक केली आहे.
वागदे येथील ओम रेसिडेन्सी, रेल्वेस्थानक मार्गावरील साईशब्द अपार्टमेंट, बांधकरवाडीतील बंगला, कोळोशी येथील घर, जानवली येथील सापळे बागेनजीकचे घर, कणकवली गांगोमंदिरसमोरच्या इमारतीमध्ये काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती. या प्रकरणी रविंद्र जितेंद्र चव्हाण, दीपक लवू गुरव, सौरभ प्रदीप कडुलकर व प्रमोद भरमाणी बाळेकुंद्री या चार युवकांना पोलिसांनी अटक केली होती. तसेच ३ लाखांचा मुद्देमालही हस्तगत केला होता.
तपासादरम्यान या चोरीच्या गुन्ह्यात केतन दिगंबर सावंत (वय १९, रा. कुंभवडे) हा संशयित युवकही सहभागी असल्याचे निष्पन्न झाले असल्याने त्यालाही अटक करण्यात आली आहे. तर शहरातील हॉटेल कालवणमधील देवेंद्र चिंदरकर यांनी या प्रकरणातील चोरीचे दोन सिलेंडर विकत घेतल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
रवींद्र चव्हाण, दीपक गुरव, सौरभ कडुलकर, प्रमोद बाळेकुंद्री यांची पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. या चौघा युवकांना पोलिसांनी पुन्हा दुसऱ्या गुन्ह्यात ताब्यात घेतले आहे. त्यांना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. तर केतन सावंत व देवेंद्र चिंदरकर यांनाही न्यायालयासमोर हजर केल्यानंतर १६ सप्टेंबरपर्यंत न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी दिली आहे.
दरम्यान, घरफोडीसह चोरीच्या या गुन्ह्यात अजूनही काही युवक सहभागी असण्याची शक्यता असून त्यादृष्टीने पोलीस तपास करीत आहेत. तर चोरी प्रकरणातील काही मुद्देमालही हस्तगत करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत. या घटनेमुळे कणकवली शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)

Web Title: Detention of two of the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.