चार जणांवर हद्दपारीची कारवाई

By Admin | Updated: September 21, 2014 00:25 IST2014-09-21T00:25:31+5:302014-09-21T00:25:31+5:30

ई. रविंद्रन : जिल्ह्यात आठ मतदार मदतकेंद्रांची स्थापना

Deportation proceedings on four people | चार जणांवर हद्दपारीची कारवाई

चार जणांवर हद्दपारीची कारवाई

सिंधुदुर्गनगरी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय पार्श्वभूमी असलेल्या ४ जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे तर ८ जणांवरील हद्दपारीची कार्यवाही सुरु आहे. तसेच ६४ जणांवर प्रतिबंधक कारवाई म्हणून हमीपत्र घेण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यात मतदार संघनिहाय प्रत्येक तहसील कार्यालयात आठ मतदार मदतकेंद्रांची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१४ निवडणूकविषयक कामकाजाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी ई. रविंद्रन बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, निवडणूक उपजिल्हाधिकारी अभय करंगुटकर, जिल्हा माहिती अधिकारी संध्या गरवारे, निवडणूक नायब तहसीलदार नंदकुमार नाटेकर व अन्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, राज्य उत्पादन शुल्कामार्फत आतापर्यंत तीन ठिकाणी कारवाई करण्यात आली असून २४ हजार २४० रुपयांचा दारुसाठा जप्त करण्यात आला आहे. प्रत्येक मतदारसंघनिहाय स्थिर सर्वेक्षण चमूची नियुक्ती करण्यात आली असून कणकवलीमध्ये ८, कुडाळमध्ये ४ व सावंतवाडीमध्ये १० स्थिर सर्वेक्षण चमूंचा समावेश आहे.
जिल्ह्यात एकूण ४३०० शस्त्र परवानाधारक आहेत. पहिल्या टप्प्यात ३९३ शस्त्र परवाना जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत तर २५१८ शस्त्र परवाना दुसऱ्या टप्प्यात जमा करण्यासाठी प्रस्तावित आहेत. मुंबई पोलीस १०७ अंतर्गत ४५ लोकांना, १०९ अंतर्गत ६ लोकांकडून तर ११० अंतर्गत ५ लोकांकडून हमीपत्र घेण्यात आली आहेत.
तसेच दारुबंदी कायद्यांतर्गत ८ लोकांकडून हमीपत्र घेण्यात आली आहेत. निवडणूक कालावधीत वाहनांचा वापर करण्यासाठी कणकवली मतदारसंघातून भाजपचे प्रमोद जठार यांनी एक वाहन, सावंतवाडी मतदारसंघातून शिवसेनेचे दीपक केसरकर यांनी दोन वाहनांसाठी परवानगी घेतली तर जिल्हाधिकारी कार्यालयातून शिवसेनेच्या वैभव नाईक यांना तीन वाहनांसाठी परवानगी देण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. (प्रतिनिधी)
विविध भरारी पथकांची नियुक्ती
जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी विविध भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जमाखर्चाचा हिशोब ठेवणारी २२ पथके, तीन मतदारसंघात तीन भरारी पथके व चित्रीकरण करणारी तीन पथके नियुक्त करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील निवडणूक व्यवस्था पाहण्यासाठी दिल्लीहून जागरुकता निरीक्षक म्हणून रतन प्रकाश हे २३ व २४ सप्टेंबरला दाखल होणार आहेत. खर्च निरीक्षक व सर्वसाधारण निरीक्षक यांच्या नियुक्त्याही लवकरच होतील. तसेच मुख्य सचिव व पोलीस महानिरीक्षक हेही सिंधुदुर्गला भेट देणार आहेत.
एक हजार पोलीस बाहेरून दाखल होणार
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्ह्यात बंदोबस्तासाठी १ हजार पोलिसांचे बळ बाहेरून मागविण्यात आले आहे. यात आठ ते दहा कंपन्या आहेत. जिल्ह्यात एकूण ५०२१ मतदान कर्मचारी नेमण्यात आले असून ९१३ मतदान केंद्रांसाठी १००३ मतदान केंद्राध्यक्ष ४०१८ मतदान अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतदान यंत्राची तपासणी पूर्ण करण्यात आली असून एकूण १०९९ मतदान यंत्र तपासून त्यांची प्रथमस्तरीय सरमिसळ करण्यात आली आहे.

Web Title: Deportation proceedings on four people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.