दोडामार्गात एकाला डेंग्यूची लागण
By Admin | Updated: November 9, 2014 23:26 IST2014-11-09T22:13:04+5:302014-11-09T23:26:55+5:30
डासांच्या फैलावाबाबत उपाययोजना कराव्यात

दोडामार्गात एकाला डेंग्यूची लागण
तालुक्यात खळबळ : इब्रामपूर येथील युवक
कसई दोडामार्ग : दोडामार्ग येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल झालेल्या इब्रामपूर येथील संदीप यशवंत इब्रामपूर (वय ३२) याला डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने दोडामार्ग तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती दोडामार्ग वैद्यकीय अधिकारी यांनी दिली. दोडामार्ग रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी संदीप इब्रामपूर हा युवक तपासणीसाठी आला होता. तेथे त्याच्या रक्ताचे नमुने घेतल्यानंतर त्याला डेंग्यूची लागण झाल्याचे निदान झाल्याने तत्काळ गोवा-बांबोळी येथे हलविण्यात आल्याची माहिती रुग्णालयातून देण्यात आली. यापूर्वी उसप येथील मळीक नामक युवकालाही या आजाराची लागण झाली होती. परंतु सध्या तो पूर्णपणे बरा झाला आहे. तो पुणे येथे शिक्षणासाठी वास्तव्यास होता. दोडामार्ग रुग्णालयात त्याच्यावर तातडीने उपचार झाल्याने तो बरा झाल्याची माहिती रुग्णालयातून मिळाली.
काही महिन्यांपासून मुंबईसह अनेक मोठ्या शहरांमध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. शहरांमधील साफसफाईचा अभाव, अस्वच्छतेमुळे डेंग्यूचा फैलाव होत आहे. शहरांपाठोपाठ आता ग्रामीण भागातही लागण होत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अशा रुग्णांनी तत्काळ औषधोपचार घ्यावेत, असे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे. (वार्ताहर)
डासांच्या फैलावाबाबत उपाययोजना कराव्यात
ग्रामसुधार समितीतर्फे ग्रामपंचायतीला निवेदन
कुडाळ : कुडाळ शहरातील रस्त्याच्या बाजूची गटारे साफ नसल्यामुळे डासांचा मोठ्या प्रमाणात फैलाव होत आहे. याचा वेळीच बंदोबस्त न झाल्यास याचा परिणाम शहरवासीयांच्या आरोग्यावर होऊ शकतो. कुडाळ ग्रामपंचायतीने याची योग्य ती खबरदारी घेऊन वेळीच औषध फवारणी व गटारातून जाणारे सांडपाणी याची योग्य व्यवस्था करावी. यासाठी कठोर योजना अंमलात आणाव्यात, अशी मागणी कुडाळ ग्राम सुधार समितीच्यावतीने कुडाळ ग्रामपंचायत सरपंच यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
डेंग्यू डासांचा प्रसार होऊ नये, म्हणून पूर्ण गावामध्ये औषधांची, धुराची फवारणी करणे, सर्व गावातील गटारे साफ करून त्यामध्ये औषध फवारणी करणे, गावांमध्ये मोठमोठ्या इमारतींतून आजूबाजूला सोडलेल्या सांडपाण्यावर ठोस उपाययोजना करावी, एसटीस्थानक, मच्छिमार्केट, ग्रामीण रुग्णालय व सार्वजनिक ठिकाणचा परिसर स्वच्छ व निर्जंतुक ठेवण्यासाठी शासनाच्यावतीने योग्य ते प्रयत्न करणे. गावातील विहिरींवर जंतुनाशक पावडर उपलब्ध करून देणे, मोठमोठ्या इमारती व हॉटेल्समध्ये सांडपाण्याची विल्हेवाट कशा रीतीने केलेली आहे, याची पाहणी करून उपाययोजना करणे. ग्रामपंचायतीने प्रसार माध्यमातून जनजागृती करावी, अशा काही उपाययोजनांचा या निवेदनात उल्लेख केला
आहे. (प्रतिनिधी)
आरोग्य विभागाने काळजी घ्यावी
सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही, याची आरोग्य विभागाकडून काळजी घेऊन रोग थांबविण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी ग्राम सुधार समितीचे अध्यक्ष शिरसाट यांनी केली आहे.