जिल्ह्यात डेंग्यूने केलीय शंभरी पार
By Admin | Updated: November 22, 2014 00:15 IST2014-11-21T22:51:56+5:302014-11-22T00:15:14+5:30
१४ रुग्ण वाढले : आरोग्य विभाग झाला अधिकच सतर्क

जिल्ह्यात डेंग्यूने केलीय शंभरी पार
रत्नागिरी : जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले असून, आतापर्यंत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या १०२ झाली आहे. मात्र, यामध्ये एकही रुग्ण दगावलेला नाही.
सध्या मुंबईसह संपूर्ण राज्यात डेंग्यू या रोगाची लागण मोठ्या प्रमाणात झालेली आहे. त्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली आहे. या रोगाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात होऊ नये, यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभाग युध्दपातळीवर जनजागृती करीत आहे.
तरीही गेल्या चार दिवसांमध्ये जिल्ह्यात डेंग्यूचे १४ रुग्ण वाढल्याने आरोग्य विभाग अधिकच सतर्क झाला आहे. घरोघरी सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र खंडागळे यांनी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना दिले आहेत.
डेंग्यू हा आजार दिवसा चावणाऱ्या एडिस ईजिप्ती या डासांपासून होतो. यामध्ये २ ते ७ दिवस तीव्र स्वरुपाचा ताप येतो. त्यानंतर डोके दुखी, सांधेदुखी, कंबरदुखी आदी लक्षणे उद्वतात.
सन २०१३ या वर्षात नोव्हेंबर महिन्यापर्यंत जिल्ह्यात ११७ डेंग्यूचे रुग्ण होते. मात्र, चालू आर्थिक वर्षाच्या नोव्हेंबरपर्यंतची स्थिती पाहता आतापर्यंत डेंग्यूचे १०२ रुग्ण आढळून आले आहेत.
जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी त्यांच्यावर आरोग्य विभाग, जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्याकडून योग्य उपचार केले जात असल्याने त्यांच्या तब्बेतीमध्ये सुधारणा होऊन ते घरी गेले आहेत. यातील काही रुग्णांवर अजूनही उपचार सुरु आहेत.
मात्र, डेंग्यूच्या आजाराने वर्षभरात जिल्ह्यात एकही रुग्ण दगावलेला नाही, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. (शहर वार्ताहर)
तालुकाडेंग्यूचे रुग्ण
मंडणगड००
दापोली०८
खेड०४ चिपळूण१०
गुहागर१६
संगमेश्वर२०
रत्नागिरी३५
लांजा०७
राजापूर०२
एकूण१०२