क्रीडा विभागाच्या चौकशीची मागणी
By Admin | Updated: August 25, 2014 22:14 IST2014-08-25T22:08:51+5:302014-08-25T22:14:05+5:30
स्पर्धक खेळाडूंच्या पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.

क्रीडा विभागाच्या चौकशीची मागणी
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा क्रीडा विभागाच्या मनमानी व भोंगळ कारभारामुळे स्पर्धेसाठी आलेले स्पर्धक विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. याबाबत सोमवारी स्पर्धक खेळाडूंच्या पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. तर क्रीडा विभागाचा कारभार सुधारावा अन्यथा स्पर्धा आयोजित करू नये, अशी मागणी करीत जिल्हा क्रीडा विभागाच्या कारभाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
जिल्हा क्रीडा विभागामार्फत सोमवारी येथील क्रीडा संकुलामध्ये धर्नुविद्या, व्हॉलिबॉल अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. मात्र स्पर्धेच्या ठिकाणी क्रीडा विभागाचे अधिकारी दुपारी १२.३० वाजेपर्यंत कोणीच फिरकलेले नाहीत. त्यामुळे स्पर्धक विद्यार्थ्यांच्या पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच क्रीडा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे स्पर्धक विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा.
धनुर्विद्या, व्हॉलिबॉल स्पर्धेसाठी आलेल्या जिल्ह्याभरातील खेळाडूंच्या कोणत्याही सोयीसुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असले तरी जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित हे सुट्टीवर गेले आहेत. त्यामुळे या स्पर्धांच्या नियोजनाला कोणीच वाली नाही. तर स्पर्धा नियोजनाची जबाबदारी घेणारा कोणीही अधिकारी दुपारपर्यंत स्पर्धेच्या ठिकाणी फिरकलेला नाही. त्यामुळे स्पर्धक व त्यांच्या पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सकाळी १० वाजता स्पर्धा सुरू होईल. म्हणून सकाळी ६ वाजता जिल्हाभरातून निघालेले स्पर्धक विद्यार्थ्यांची उपासमार झाली. याबाबत काही पालकांनी निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड तसेच अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर तावडे यांचे लक्ष वेधले आहे.
जिल्हा क्रीडा विभागामार्फत वर्षभरात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. यासाठी या स्पर्धांसाठी लाखो रूपये शासनाचा निधी कागदोपत्री खर्चही दाखविण्यात येतो. मात्र प्रत्यक्षात येथे येणाऱ्या खेळाडूंना सोयीसुविधा पुरविण्यात येतात का? हा प्रश्न आहे. केवळ शासनाचा निधी खर्च घालण्यासाठीच स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. वारंवार स्पर्धांच्या वेळेत बदल कणे, ठिकाणे बदलणे, जेवण- नाश्तासारख्या सोयी न पुरविणे, वेळेत स्पर्धांचे उद्घाटन न करणे, खेळाडू आणि स्पर्धेकडे दुर्लक्ष करणे अशा या क्रीडा विभागाच्या भोंगळ कारभाराचा त्रास प्रत्येक स्पर्धेवेळी खेळाडूंना सहन करावा लागत आहे. जिल्हा क्रीडा विभागाचा भोंगळ कारभार सुधारावा, खेळाडूंना आवश्यक सुविधा पुरविण्यात याव्यात, अशी मागणी वारंवार स्पर्धकांकडून होत असते. जिल्हा प्रशासनही या अनागोंदी कारभाराकडे दुर्लक्षच करीत असल्याचा आरोप खेळाडूंकडून होत आहे. अशाचप्रकारे आजच्या स्पर्धेबाबत खेळाडूंच्या पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले
आहे. (प्रतिनिधी)