विकास निधीची मागणी धुडकावली
By Admin | Updated: September 11, 2014 23:11 IST2014-09-11T21:39:46+5:302014-09-11T23:11:14+5:30
अध्यक्षा, सीईओंमध्ये खडाजंगी : जिल्हा परिषद स्थायी समिती सभेत वादंग

विकास निधीची मागणी धुडकावली
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद विकास निधीसाठी शासनाने मान्यता दिली नसल्याने विकास निधी वाटपाच्या प्रतिक्षेत असलेल्या सदस्यांची घोर निराशा झाली आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विकास निधीचा स्वतंत्र हेड नसल्याने आपण कोणतेही बेकायदेशीर काम करणार नसल्याचे स्पष्ट करीत विकास निधी वाटपाची मागणी धुडकावून लावली.
दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे जिल्हा परिषद अध्यक्षा व दिलीप पांढरपट्टे यांच्यात खडाजंगी झाली. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्हा परिषद पदाधिकारी आणि अधिकारी यांच्यातील वादंग चव्हाट्यावर आला आहे. जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा जिल्हा परिषद अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, शिक्षण व आरोग्य सभापती प्रकाश कवठणकर, महिला व बालविकास सभापती श्रावणी नाईक, सदस्य मधुसुदन बांदिवडेकर, संग्राम प्रभूगावकर, गुरूदास पेडणेकर, वंदना किनळेकर, अॅड. रेवती राणे, संजय बोबडी, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.
जिल्हा परिषद विकास निधी सर्व सदस्यांना समान वाटप व्हावे, असा ग्रामविकास विभागाचा निर्णय झाला असल्याचे सभागृहात पदाधिकाऱ्यांमार्फत सांगताच मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी या विधानाला आक्षेप घेत तसा कोणताही निर्णय झाला नसून विकास निधीच्या हेडखाली हा निधी खर्च होणार नाही, तर हा निधी स्वनिधीतून खर्च केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. यावर जिल्हा परिषद अध्यक्षा पडते यांनी आपण कोणत्याही प्रकारे सकारात्मक चर्चा केली नसल्याचा आरोप सीईओंवर केला. त्यामुळे अधिकारी व पदाधिकारी यांच्यात वाद झाला. निधी खर्च होणार मात्र तो विकास निधीऐवजी स्वनिधीतून खर्च होणार असल्याचे सीईओंनी स्पष्ट केले. आपल्या मतदारसंघातील काम सुचविताना अध्यक्षांच्या परवानगीने कामांना मंजुरी दिली जाईल. सीईओ आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विरूद्ध पदाधिकारी असा संघर्ष झालेला सभागृहात पहावयास मिळाला.
आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी पावसाळा कालावधी पाहता रूग्णांच्या सेवेसाठी आपण काम करीत असलेल्या ठिकाणी (मुख्यालय) राहणे आवश्यक आहे. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कित्येक कर्मचारी हे मुख्यालयी राहत असल्याचे भासवून घरभाडे लाटत असल्याचे सभागृहात उघड झाले. मात्र, यावर आरोग्य विभागामार्फत कोणतीच कार्यवाही होत नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. घरभाडे लाटणे हा एक प्रकारचा भ्रष्टाचार आहे, असा आरोप अंकुश जाधव यांनी केला. यावर सर्व चर्चेअंती मुख्यालयात राहत नाही, त्यांचे घरभाडे बंद होणार असल्याचे स्पष्ट केले.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी नुकत्याच केलेल्या दौऱ्यात वेंगुर्ला मठ नं. १ प्राथमिक शाळेत पटसंख्येमध्ये तसेच पोषण आहार वाटपामध्ये तफावत असल्याचे आढळून आले. संबंधित शिक्षकांवर काय कारवाई केली? असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला असता, मुले गैरहजर असताना हजेरी लावण्यात आली. पटसंख्येमध्ये तफावत आढळल्यामुळे संबंधित दोन शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी धाकोरकर यांनी दिली. तर संबंधित शिक्षकांवर केलेल्या कारवाईचा अहवाल दोन दिवसात सादर करा, असे आदेश अध्यक्षा पडते यांनी दिले. (प्रतिनिधी)