कुडाळातील अतिक्रमणे हटवा

By Admin | Updated: August 20, 2014 00:48 IST2014-08-19T22:32:54+5:302014-08-20T00:48:32+5:30

लोकशाही दिनात तहसीलदारांचे आदेश

Delete encroach encroachers | कुडाळातील अतिक्रमणे हटवा

कुडाळातील अतिक्रमणे हटवा

कुडाळ : आकेरी येथील सर्व शिक्षा अभियानांतर्गत बांधलेल्या शाळेच्या इमारतीसंदर्भात योग्य ती तपासणी करा. तसेच शहरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी तत्काळ कारवाई करा, असे आदेश कुडाळ तहसीलदार यांनी बांधकाम विभागाला लोकशाही दिनात दिले.
कुडाळ तालुक्याचा लोकशाही दिन कुडाळ तहसील कार्यालय येथे तहसीलदार जयराज देशमुख, पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार, गटविकास अधिकारी व्ही. एस. नाईक यांच्या उपस्थितीत पार पडला. या लोकशाही दिनात सात अर्ज आले होते.
सर्व शिक्षा अभियानांतर्गत बांधलेल्या शाळेचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असून इमारतीमधून पाणी गळत आहे.
तसेच पूर्णत्वाचा दाखला मिळाला नसतानाही मुलांना या धोकादायक इमारतीत बसविले जाते. त्यामुळे या इमारतीच्या बांधकामाची चौकशी व्हावी, असा तक्रारअर्ज आकेरी येथील महेश जामदार व नारायण सांगळे यांनी केला होता. वालावल येथील बेकायदेशीर बॅनरबाबत कारवाई व्हावी, मुख्यालयात कायमस्वरुपी तलाठी व पालीस पाटील द्यावा, असे अर्ज वालावल येथील प्रभाकर चौधरी यांनी केले. कुडाळ भैरववाडी येथील पुरुषोत्तम वानेकर यांनी खरेदी खत जमीन मोजणीत तफावत असून पुन्हा जमीन मोजणी करण्यात यावी, असा तक्रार अर्ज केला होता. तर पावशी येथील चंद्रकांत अणावकर यांनी, उत्पन्न देणाऱ्या झाडावरून गेलेल्या विद्युत तारांमुळे झाडांचे नुकसान झाल्याबाबत, तर पावशी येथीलच सुहासिनी कुंभार यांनी सार्वजनिक विहिरीकडे जाणारी पायवाट बंद केल्याप्रकरणी तक्रार अर्ज दाखल केला होता. या सर्व तक्रार अर्जांवर योग्य ती कार्यवाही संबंधित विभागाकडून करण्यात येईल, असे तहसीलदार जयराज देशमुख यांनी सांगितले. या लोकशाही दिनास संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
गणेशोत्सव जवळ आला असून वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतूक समस्या वाढत आहेत. शासनाच्या जागेत अतिक्रमणे वाढत चालली आहेत. परंतु यासंदर्भात अतिक्रमणे हटविण्याचे आदेश तहसीलदारांनी देऊनही बांधकाम विभाग ही अतिक्रमणे हटविण्याबाबत कोणतीच पावले उचलली नाहीत. त्यामुळे या संदर्भात तत्काळ कारवाई करा, असे आदेश तहसीलदारांनी बांधकाम विभागाला दिले. (प्रतिनिधी)
ग्रामपंचायत बॅनर हटवित
नाही : बिराजदार
शहरातील कालबाह्य झालेले तसेच इतर धोकादायक स्थितीतील बॅनर हटवावेत, यासंदर्भात लेखी पत्र ग्रामपंचायत विभागाला दिले होते. परंतु ग्रामपंचायतीने अद्याप कोणतीच कार्यवाही केली नसल्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार यांनी सांगितले.

Web Title: Delete encroach encroachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.