कुडाळ : भडगाव नदीपात्रात दुचाकी पडून झालेल्या अपघातानंतर गेले चार दिवस बेपत्ता असलेल्या दीप्ती जिकमडे (२८, रा. अणाव-दाभाचीवाडी) हिचा मृतदेह अखेर पाचव्या दिवशी कडावल येथील नदीपात्रात आढळून आला.मंगळवारी रात्री अणाव-दाभाचीवाडी येथील हरी व त्यांची पत्नी दीप्ती हे दोघे जांभवडे येथील त्यांच्या पाहुण्यांकडून पुन्हा अणाव येथे दुचाकीने येत होते. रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास भडगाव नदी पुलावरून जात असताना अचानक त्यांच्या दुचाकीसमोर साप आला. सापाला वाचविण्याच्या प्रयत्नात तोल जाऊन जिकमडे दाम्पत्य दुचाकीसह नदीपात्रात कोसळले. हरी जिकमडे यांनी पोहत किनारा गाठला, मात्र त्यांची पत्नी दीप्तीचा थांगपत्ता लागला नव्हता.
शोध मोहीम सुरू असतानाच सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कडावल चर्चजवळील नदीपात्रात दीप्तीचा मृतदेह बाबल आल्मेडा यांच्या टिमला सापडल्यानंतर हे शोध कार्य थांबविण्यात आले. या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.पतीवर गुन्हा दाखल होण्याची शक्यतादीप्ती हिचे माहेर कुडाळ येथे असून, अणाव येथील हरी जिकमडे यांच्याशी दोन महिन्यांपूर्वी तिचे लग्न झाले होते. तिच्या मृत्यूची बातमी समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, हयगयीने दुचाकी चालवून दीप्ती हिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तिचा पती हरी जिकमडे याच्यावर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे. तशी माहिती पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी दिली.