दीपक केसरकरांना हादरा
By Admin | Updated: September 21, 2014 00:35 IST2014-09-21T00:35:27+5:302014-09-21T00:35:27+5:30
सावंतवाडी पालिका : नगराध्यक्षांसह अन्य दोन नगरसेवकांचा सेनेत जाण्यास नकार

दीपक केसरकरांना हादरा
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपालिकेत एकहाती सत्ता असणाऱ्या माजी आमदार दीपक केसरकर यांना चांगलाच हादरा बसला आहे. केसरकर हे राष्ट्रवादी काँॅग्रेसमधून शिवसेनेत गेल्यानंतर पालिकेत शिवसेनेचा गट स्थापन करण्याची प्रकिया सुरू आहे. मात्र, याला तीन नगरसेवकांनी ठेंगा दाखविला आहे. या नगरसेवकांनी शिवसेनेत जाण्यास नकार दिला आहे. या तीन नगरसेवकांमध्ये नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचाही समावेश आहे.
सावंतवाडी नगरपालिकेत अडीच वर्षांपूर्वी काँग्रेसला शह देत तत्कालीन आमदार दीपक केसरकर यांनी सर्वच्या सर्व १७ नगरसेवक निवडून आणले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यास केसरकरांनी नकार दिल्याने राष्ट्रवादीच्या पक्ष नेतृत्वामध्ये त्यांच्याबद्दल नाराजीचा सूर होता. त्यातच महिनाभरापूर्वी केसरकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी पालिकेतील सर्व नगरसेवक हातात शिवबंधन बांधतील, असे वाटत होते. मात्र, त्यातील तीन नगरसेवकांनी सेनेत जाण्यास नकार दिला आहे.
विधानसभा निवडणुकीत केसरकर यांचा किंबहुना शिवसेनेचा प्रचार करण्यासाठी पालिकेतील नगरसेवक ठिकठिकाणी फिरणार असून, त्यावर राष्ट्रवादीच्या कोणी आक्षेप घेऊ नये, यासाठी निवडणूक आयोगाच्या नियमांप्रमाणे गट स्थापन करून त्या गटाला जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी घेण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. मात्र, हा गट स्थापन करण्यापूर्वी केसरकरांना या नगरसेवकांनी हादरा दिला आहे. नगराध्यक्ष साळगावकर यांच्यासह नगरसेवक राजू बेग व गोविंद बाळा वाडकर हे केसरकर यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. मात्र, राष्ट्रवादीतून शिवसेनेत जाण्याला त्यांनी विरोध दर्शविला होता.
केसरकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला; तरी या नगरसेवकांनी राष्ट्रवादीमध्ये राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. दरम्यान, तरीही १४ नगरसेवकांनी पालिकेत शिवसेनेचा गट स्थापन करण्यास परवानगी दिल्याने पालिकेवर शिवसेनेचाच वरचष्मा राहणार आहे. (प्रतिनिधी)
साळगावकर राष्ट्रवादीतचं
सावंतवाडी पालिकेचा गट स्थापन करण्यात आला आहे. याबाबत मला कोणतीही माहिती नाही; पण मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार आहे. अन्य कोणते नगरसेवक राष्ट्रवादीत राहणार याचीही माहिती नसल्याचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी स्पष्ट केले.