सिंधुदुर्गनगरी पर्यावरण पूरक म्हणून विकसित करूया : दीपक केसरकर
By Admin | Updated: April 13, 2017 18:38 IST2017-04-13T18:38:51+5:302017-04-13T18:38:51+5:30
यंदाचं वर्ष सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालयाचे रौप्यमहोत्सवी वर्ष

सिंधुदुर्गनगरी पर्यावरण पूरक म्हणून विकसित करूया : दीपक केसरकर
सिंधुदुर्गनगरी, दि. १३ : जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर मुख्यालय म्हणजेच सिंधुदुर्गनगरी शहराच्या निर्मितीस २५ वर्षे पूर्ण होत आहेत. याअनुषंगाने यंदाचे वर्ष रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून साजर करूया. सिंधुदुर्गनगरी पर्यावरण पूरक म्हणून या शहराच्या विकासाचा प्रयत्न करूया. यासाठी सवार्नी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.
येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित नागरिक, पत्रकार, व्यापारी, ग्रामस्थ, शासकीय अधिकारी,कर्मचारी यांच्या बैठकीत पालकमंत्री केसरकर बोलत होते.
जिल्हा मुख्यालयास पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याबाबत शासनामार्फत २५ कोटी रूपयांचा विशेष निधी मंजूर झाला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिक, ग्रामस्थ, पत्रकार, व्यापारी यांचेकडून विधायक सूचना याव्यात व याबाबत सविस्तर चर्चा व्हावी यासाठी ही बैठक आयोजित केली होती.
यावेळी व्यासपीठावर आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी रविंद्र सावळकर,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, जिल्हा नियोजन अधिकारी हरिबा थोरात उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्याची भव्य प्रतिकृती साकारणार
सिंधुदुर्गनगरीच्या प्रवेशव्दाराजवळ सिंधुदुर्ग जिल्ह्याची भव्य प्रतिकृती तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा व स्वागतकमान उभारण्याची सूचना करून पालकमंत्री म्हणाले की, मुख्यालयातील सर्व प्रकशासकीय इमारती निवासी संकुल यांची दुरूस्ती व रंगरंगोटी करण्यात येईल. मुख्यालयातील सर्व रस्त्यांची दुरूस्ती तसेच स्ट्रीट लाईट सर्व ठिकाणी लावण्यात येतील. दाभाचीवाडी तलाव परिसरात पर्यटन स्थळ सुशोभिकरण या ठिकाणी गार्डन तसेच बोटींग सुविधा सुरू करण्याबाबतचा पर्यटन महामंडळाने आराखडा तयार करावा. दहा टक्के विकसित भूखंड भूमिपूत्रांना वितरीत करण्याबाबतचा प्रस्ताव प्राधिकरणाने तयार करावा. निवासी संकुलातील सांडपाणी पुर्नवापराबाबतचा प्रस्ताव तयार करावा. शासकीय आस्थापनांनी व निवासी संकुलातील शासकीय अधिकारी, कर्मचा-यांनी तसेच नागरिकांनी जास्तीत-जास्त संख्येने आंबा, फणस, जांभूळ, जांभ आदी प्रकारच्या फळझाडांचे वृक्षारोपणास पुढाकार घ्यावा, आदी सूचना यावेळी पालकमंत्री केसरकर यांनी केल्या.?
मुख्यालयातील मालमत्तांचे सात/बारा मिळणार
सिंधुदुर्गनगरी येथे नव्याने येणा-या एन. सी. सी. बटालियनबाबत सविस्तर माहिती देऊन जिल्हाधिकारी उदय चौधरी म्हणाले की, जलतरण तलाव येत्या काही दिवसांत प्राधिकरणामार्फत सुरू करण्यात येईल. मुख्यालय स्थापनेपासून येथील मालमत्ताधारकांना त्यांच्या मालमत्तेविषयी कोणताही अधिकृत कागद उपलब्ध नव्हता. तथापि आता प्राधिकरणामार्फत मालमत्ता मोजणी काम सुरू आहे. नागरिकांनी मोजणीवेळी उपस्थित राहून आपले हद्दीप्रमाणे निस लावले याची खात्री करावी. नजिकच्या काळात मालमत्ताधारकांना सात-बारा वितरण केले जाणार आहे.या बैठकीत उपस्थित नागरिक, पदाधिकारी यांनी खालीलप्रमाणे सूचना दिल्या.
जि. प. सदस्य अमरसेन सावंत म्हणाले की, डंपिंग गार्डनची जागा बदलावी, पीटढवळ नदीवर बंधारा व्हावा, डीगस धरणातून पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईनची दुरूस्ती व्हावी, स्मृतीवनाचं सुशोभिकरण व्हाव. महेश पारकर म्हणाले की, गार्डन सिटीवर आधारित जिल्हा निर्मिती झाली. गुलमोहरची झाडे लागवड मोठ्या प्रमाणात व्हावी, ड्रेनेज सुविधा व्हावी,भविष्यात सिंधुदुर्गनगरीची लोकवस्ती वाढणार हे गृहीत धरून गावडेवाडी धरणातील पाणी योजना करावी.
माजी सरपंच नागेश ओरोसकर म्हणाले की, निवासी संकुलातील सांडपाणी नाल्यात सोडल जात त्यावर ट्रीटमेंट होऊन पाणी सोडावे. यावेळी सुनिल जाधव म्हणाले की, ओरोस मुख्यालयासाठी शेतक-यांच्या जमिनी गेल्या आहेत, त्यांना व्यवसायासाठी मदत मिळावी, ओरोस बाजारपेठेचं नुतनीकरण करावे, अंतर्गत रस्त्याची दुरूस्ती व्हावी. व्दारकानंद डिचोलकर म्हणाले की, दिशादर्शक फलक, रस्त्यावर लाईट सुविधा, प्रकाश जैतापकर प्राधिकरणला २५ वर्षे पूर्ण झालीत, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचे सुशोभिकरण व्हावे, अनधिकृत बांधकामे हटवावीत, हॉकर झोन सुरू करावा, रस्त्यांची दुरूस्ती, उपहारगृह सुविधा व्हावी, फिल्टरेशन प्लॉटचे नुतनीकरण व्हावे. बी. पी. चव्हाण म्हणाले की, महावितरणमार्फत ट्रान्?सफॉर्मर बसविला जात नाही. नारायण मांजरेकर म्हणाले की, दाभाचीवाडी मुख्यालयास जमिन देणा-या भूमिपूत्रांना अल्प मोबदला मिळाला आहे त्यांना व्यवसाय उभारण्यासाठी मदत मिळावी. फळबाग झाडांच्या किंमती निश्चित करून मोबदला देणे प्रलंबित आहे त्यावर निर्णय द्यावा. कचरा डंपिंग ग्राऊंड दाभाचीवाडी जवळ आहे तो बदलावा. के. आर. सुतार म्हणाले की,व्यापारी मुख्यालयात व्यापा-यांकरता राखीव जागा नाही. व्यापार पेठेसाठी राखीव भूखंड मिळावा. घोगळे म्हणाले की, कॅटरिंग कॉलेज व्हावे, महिला पॉलिटेक्निक व्हावे, शासकीय तांत्रिक विद्यालय व्हावे.
मुख्यालय परिसराची पालकमंत्र्यांकडून पाहणी
सकाळी पालकमंत्री केसरकर यांनी मुख्यालय परिसरात फिरून विविध ठिकाणी भेटी दिल्या व परिसराची पाहणी केली. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पाहणीस प्रारंभ केला. ओरोस आठवडा बाजार मार्केट, सिडको भवन, बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवनाची नियोजित जागा जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कर्मचारी निवासी संकुल, टाऊन गार्डन, जिल्हा कारागृह, स्मृतीवन, दाभाचीवाडी पर्यटन स्थळ याठिकाणी भेटी देऊन परिसराची पाहणी केली. यावेळी आमदार वैभव नाईक, अतुल काळसेकर, प्रभाकर सावंत, जान्हवी सावंत, सरपंच मंगला ओरोसकर, ग्रामस्थ तसेच अधिकारी उपस्थित होते.