सिंधुदुर्गात जांभूळ शेतीला उतरती कळा
By Admin | Updated: May 23, 2016 00:18 IST2016-05-22T21:12:56+5:302016-05-23T00:18:37+5:30
सिंधुदुर्गात जांभूळ शेतीला उतरती कळा चार वर्षात मोठ्या प्रमाणात घट

सिंधुदुर्गात जांभूळ शेतीला उतरती कळा
सुरेश बागवे -- कडावल --सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जांभूळ काढण्याचा व्यवसाय या हंगामात मोठ्या प्रमाणात चालतो. पण, अलिकडच्या कालावधीत जांभळाचे उत्पादन कमी झाल्याचे दिसून येते. शेतकऱ्यांनी केलेले दुर्लक्ष आणि प्रशासनाचा जांभूळाच्या बाबतीत नकारार्थी दृष्टीकोन यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जांभूळ शेतीला मोठ्या प्रमाणावर उतरती कळा लागल्याचे दिसून येते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा, काजू उत्पादनाबरोबरच जांभळातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. जांभूळ मधुमेहासारख्या आजारांवर गुणकारी आहे. त्यामुळे या दुर्लक्षित पिकाकडे व्यापारी दृष्टीकोनातून पाहण्याची गरज आहे. मात्र, या पिकावर आता निसर्गानेही आपली वक्रदृष्टी वळविली आहे. गेल्या चार वर्षात जांभळाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. यावर्षी तर जांभळाचे उत्पादन अतिशय कमी झाले आहे. झाडावर जांभळे दिसेनाशी झाली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातून होणारी जांभळाची निर्यात मंदावली आहे. खुद्द आकेरी गावातून जांभळे अल्प्र प्रमाणात निर्यातीसाठी दाखल होत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे गेल्या काही वर्षात जांभूळ या झाडाची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तोड झाल्याचे दिसत आहे. आकेरी गाव जांभळासाठी प्रसिध्द आहे. या ठिकाणाहून जांभळांची महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर निर्यात होते. आता जांभळाच्या नवीन जाती कृषी विद्यापीठाने विकसित केल्या आहेत. त्याचा अभ्यास करून त्याची आंबा, काजूप्रमाणे लागवड करणे आवश्यक आहे. असे झाल्यास जिल्ह्यातील कमी झालेले जांभळाचे उत्पादन पुन्हा वाढेल. त्यातून आर्थिक उलाढाल पुन्हा वाढेल, यासाठी शेतकऱ्यांनी आता निसर्गातील झाडांवरच अवलंबून न राहता त्यांची पुनर्लागवड करून त्याकडे त्यादृष्टीने पाहणे गरजेचे आहे. (वार्ताहर)