पक्षश्रेष्ठी घेतील तो निर्णय मान्य
By Admin | Updated: September 12, 2014 23:51 IST2014-09-12T23:48:23+5:302014-09-12T23:51:21+5:30
वेंगुर्लेतील 'त्या' सात नगरसेवकांची स्पष्टोक्ती

पक्षश्रेष्ठी घेतील तो निर्णय मान्य
वेंगुर्ले : सातही नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाच्या विरोधात कोणतेही काम केलेले नाही. यापुढेही पक्षश्रे्रष्ठी जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, असे मत राष्ट्रवादीच्या सात नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. तर जिल्हाधिकारी यांच्या या निर्णयाविरोधात आपण स्टे घेणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
हॉस्पिटल नाका येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका संपर्क कार्यालयात माजी नगराध्यक्ष, नगरसेविका डॉ. पूजा कर्पे, नम्रता कुबल, गटनेते वामन कांबळे, मनीष परब, अवधूत वेंगुर्लेकर, फिलोमिना कार्डोज, शैलेश गावडे यांच्यासह तालुकाध्यक्ष अॅन्थोनी डिसोजा व जिल्हा बँक संचालक नितीन कुबल यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी माहिती देताना नगरसेवक म्हणाले की, ९ जुलै २०१३ रोजी पक्षनिरीक्षक किरण पावसकर यांनी कुडाळ येथे बोलाविलेल्या बैठकीच्या अजेंड्यावर वेंगुर्ले नगरपरिषद नगराध्यक्ष निवडणुकीसंदर्भात असा कोणताही उल्लेख नव्हता. आतापर्यंत आम्ही सातही नगरसेवक पक्षाचे सर्व आदेश पाळत आलो आहोत. अलीकडेच झालेल्या नगराध्यक्ष निवडणुकीच्या वेळीही पक्षनिरीक्षक किरण पावसकर यांच्या सुचनेनुसार आम्ही प्रसन्ना कुबल यांना कोणताही विरोध न करता बिनविरोध निवडून दिले आहे. असे असूनही फुटीर नगरसेवक म्हणून आमच्यावर शिक्का मारला जात आहे, तो चुकीचा आहे. आम्ही पक्षविरोधी कोणतीच कारवाई केली नाही.
याउलट त्या पाच नगरसेवकांनी केसरकर यांच्याबरोबर राहून सेनेचा प्रचारही नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत केला होता. त्यामुळे तेच खरे फु टीर आहेत. बाराही नगरसेवकांवर जी कारवाई झाली, त्यात दीपक केसरकर हेच जबाबदार आहेत. बाराही नगरसेवक निलंबित ठेवून नगरपरिषद बरखास्त झाल्यास त्यांना पुन्हा आपला वरचष्मा दाखवायचा आहे, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)