पर्ससीनविरोधात लढा उभारण्याचा निर्णय
By Admin | Updated: December 2, 2014 00:28 IST2014-12-01T21:52:36+5:302014-12-02T00:28:28+5:30
पारंपरिक मच्छिमारांची बैठक

पर्ससीनविरोधात लढा उभारण्याचा निर्णय
मालवण : अवाजवी बेकायदेशीर पर्ससीनच्या मासेमारीमुळे माशांच्या काही प्रजाती कमी होत चालल्या असून पर्ससीनच्या बेकायदेशीर मच्छिमारांकडे दुर्लक्ष झाले आहे. थोडक्यात शासनाचा कारभार हा आंधळं दळतंय आणि कुत्र पीठ खातंय या पद्धतीचा चाललेला आहे. म्हणूनच पारंपरिक मच्छिमारांनी आता एकजूट दाखवून बेकायदेशीर पर्ससीन मच्छिमारीविरोधात तीव्र लढा उभारावा. तसेच मालवण बंदरात कोणीही पर्ससीनची मासळी खरेदी करू नये, असा महत्त्वपूर्ण निर्णय सोमवारी पारंपरिक मच्छिमार, मत्स्य विक्रेते, मत्स्य एजंट यांच्या बैठकीत घेण्यात आला.
मालवण चौकचार येथे सोमवारी पारंपरिक मच्छिमार, मत्स्य विक्रेते व एजंटांची पर्ससीन मासेमारीविरोधात संयुक्त बैठक झाली. या बैठकीत मच्छिमार नेते छोटू सावजी, बाबी जोगी, सन्मेश परब, विकी तोरसकर, दिलीप घारे, बाबू आचरेकर, घन:श्याम जोशी, रूपेश प्रभू, मिथून मालंडकर, दादा आचरेकर, महेश कोयंडे, बाबा तारी, भाऊ मोर्जे, शेखर तोडणकर, नारायण धुरी, प्रशांत तोडणकर, कल्पेश रोगे, किसन गावकर, हिरोजी कांदळगावकर, पंकज सादये, उमेश हुले, रमेश कुबल आदी उपस्थित होते.
छोटू सावजी म्हणाले, युएनडीपीतर्फे मालवणच्या समुद्रात प्रकल्प राबविला जात आहे. यात या प्रकल्पाचे नियम व कायदे कडक असल्याने पारंपरिक मच्छिमारांनी हा प्रकल्प समजावून घेणे आवश्यक आहे. आज शासन भांडवलदारांचे लांगूनचालन करीत आहे. यामुळे पारंपरिक मच्छिमारांनी याचा विचार करून संघटीत होणे गरजेचे आहे. आज पारंपरिक मच्छिमारांकडून जी आंदोलने उभी केली जात आहेत ती पैशासाठी नव्हेत तर मच्छिमारांच्या हितासाठी आंदोलन उभारले जात आहे. त्यामुळे आपापसात भांडणे करू नयेत, असे त्यांनी सांगितले.
दिलीप घारे यांनी, पर्ससीनच्या विरोधातील आव्हान स्विकारले असून पारंपरिक मच्छिमारांबाबत शासन समिती नेमून अहवाल तयार करण्याचे काम करीत आहे, हे सारे दिखावूपणाचे आहे. त्यामुळे आपल्या रोजीरोटीसाठी आपणच संघर्ष करून रोजीरोटी मिळवली पाहिजे, असे ते
म्हणाले. (प्रतिनिधी)