उमेदवारीबाबतचा निर्णय श्रेष्ठीच घेतील
By Admin | Updated: August 12, 2014 23:12 IST2014-08-12T22:16:18+5:302014-08-12T23:12:52+5:30
नीतेश राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती

उमेदवारीबाबतचा निर्णय श्रेष्ठीच घेतील
कणकवली : काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाबाबत वाटाघाटी सुरू आहेत. काही मतदारसंघांची अदलाबदलही होणे शक्य आहे. त्यामुळे कणकवली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार की नाही याबाबत नंतरच बोलू, असे सांगतानाच निवडणूक लढविण्याचा दावा कोणीही करू शकतो. मात्र उमेदवारीबाबतचा निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठीच घेतील, असे काँग्रेसचे प्रांतिक सदस्य नीतेश राणे यांनी येथे स्पष्ट केले.
येथील ओमगणेश निवासस्थानी मंगळवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार विजय सावंत यांनी कणकवली विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे. यासंदर्भातील प्रश्नावर ते म्हणाले, विधानसभा जागा वाटपाबाबत वरिष्ठ स्तरावर प्रक्रिया सुरू असून मतदारसंघावर कोणीही दावा करू शकतो. मात्र याबाबतचा निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठीच घेतील.
नारायण राणे आपल्या समर्थकांना सांभाळू शकले नाहीत, अशी टीका आमदार विजय सावंत यांनी केली होती. याविषयी बोलताना नीतेश राणे म्हणाले, आमच्याबरोबर न राहता आम्ही काय सांभाळू शकतो ते त्यांना कसे समजणार? तसेच ते काय काय सांभाळू शकतात याबाबत मी बोलून चालेल का?
राणे पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमधील मरगळ झटकून टाकण्यासाठी आगामी काळात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
१८ आॅगस्ट रोजी जिल्हा काँग्रेसच्यावतीने जिल्ह्यातील ५० जिल्हा परिषद मतदारसंघात प्रत्येकी १० हजार रूपयांची दहिहंडी बांधण्यात येणार आहे. जिल्हा परिषद सदस्य या उपक्रमाचे नियोजन करणार आहेत. ज्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य नसतील त्या ठिकाणी विभागीय अध्यक्षांकडे जबाबदारी देण्यात आली आहे.
या कार्यक्रमाला जिल्ह्यातील काँग्रेस नेते स्थानिक स्तरावर उपस्थित राहतील. न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसारच हा दहिहंडीचा कार्यक्रम करण्यात येणार आहे. दहिहंडी फोडणाऱ्या गोविंदांची सुरक्षितताही तितकीच महत्त्वाची असल्याचेही राणे यांनी यावेळी सांगितले. (वार्ताहर)