पदाधिकारी निवडीवेळी वाद
By Admin | Updated: March 23, 2015 00:35 IST2015-03-22T23:19:46+5:302015-03-23T00:35:12+5:30
फोंडाघाट शिक्षण संस्था निवडणूक : चेअरमनपदी दत्तात्रय पवार तर सचिवपदी सुदन बांदिवडेकर

पदाधिकारी निवडीवेळी वाद
कणकवली : फोंडाघाट शिक्षण संस्थेच्या चेअरमनपदी दत्तात्रय पवार यांची चौथ्यांदा गुरुवारी निवड झाली आहे तर सचिवपदी सुदन बांदिवडेकर व खजिनदारपदी विठोबा तायशेटे यांची निवड झाली. दरम्यान, संचालकांच्या या निवडीवेळी वादही झाले. पाच सदस्यांनी आपले राजीनामे देत सभागृहातून जाणे पसंत केले तर उर्वरित दहा सदस्यांनी ही निवड प्रक्रिया पार पाडली. त्यामुळे फोंडाघाट शिक्षण संस्थेची निवडणूक यावेळीही दरवर्षीप्रमाणे लक्षवेधी ठरली.फोंडाघाट शिक्षण संस्थेच्या यावर्षीच्या १५ जागांसाठी ३१ उमेदवार रिंगणात होते. लढतीत दोन पॅनेलमधील काही उमेदवार गतनिवडणुकीपेक्षा अदलाबदली झाले होते. उत्कर्ष पॅनेलमधून सुदन बांदिवडेकर, रंजन नेरूरकर, शेखर लिंग्रस, सचिन तायशेटे, बबन हळदिवे, अभिजीत रेवडेकर, संदेश पटेल हे विजयी झाले तर प्रदीप पटेल, संजय सावंत, भाई सावंत, विशाल रेवडेकर, शामराव भोवड, दिलीप पारकर, अशोक सावंत, संतोष टक्के हे पराभूत झाले. परिवर्तन पॅनेलमधून दत्तात्रय पवार, राजन चिके, मनीष गांधी, हेमंत राणे, संजू आपटे, रमेश भोगटे, उदय मोदी, समीर मांगले हे विजयी झाले तर अविनाश सापळे, सुंदर पारकर, सुहास मोदी, मोहन सामंत, प्रसाद पावसकर, बाळा वळंजू, अभिनंदन डोर्ले हे पराभूत झाले. उत्कर्षचे सात तर परिवर्तनचे आठ संचालकपदी निवडून आले.
संचालकांमधून चेअरमन व इतर निवडीसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यात माजी चेअरमन प्र. रा. सावंत हे अनुपस्थित असल्याने सर्वानुमते राजन चिके यांची बैठकीच्या अध्यक्षस्थानी निवड करण्यात आली. परिवर्तन पॅनेलचे बहुमत होते. मात्र चेअरमन निवडीसाठी या पॅनेलचे संजू आपटे यांच्याबरोबर याच पॅनेलच्या दत्तात्रय पवार यांनीही चेअरमनपदासाठी इच्छा व्यक्त केली.
बैठकीला उपस्थित दहा संचालकांमधून शेखर लिंग्रस यांची अध्यक्ष म्हणून निवड करून पुढील बैठक चालविण्यात आली. यात चेअरमनपदी दत्तात्रय पवार, सचिवपदी ुसुदन बांदिवडेकर व खजिनदारपदी सचिन तायशेटे यांची निवड करण्यात येवून तसा ठराव पुढे पाठविण्यात आला. याबाबत या प्रक्रियेचे निवडणूक अधिकारी मोहन पारकर म्हणाले, १५ पैकी ५ जणांनी राजीनामे दिले. त्यामुळे दहा सदस्य सभागृहात उपस्थित असताना बैठक तहकूब कशी होणार? कोरम पूर्ण असताना अध्यक्षांनी व बैठक बोलावणाऱ्या सचिवांनी अजेंड्याप्रमाणे बैठक पुढे का केली नाही? अजेंड्यामध्ये राजीनामा, आयत्यावेळचे विषय असे मुद्दे नसताना सभाध्यक्षांनी राजीनामे कसे स्वीकारले? (प्रतिनिधी)
पाच सदस्यांनी दिले राजीनामे
दत्तात्रय पवार हे बंडखोरी करीत असल्याचा आरोप करीत संजू आपटे यांच्यासह पाच सदस्यांनी राजीनामे देत असल्याचे सांगितले. यावेळी अध्यक्ष राजन चिके हे देखील तेथून बाहेर पडले. यावेळी बैठकीच्या अजेंड्यावर राजीनामा हा विषय नसून ही बैठक पदाधिकारी निवडीची आहे. राजीनामे द्यायचे होते तर विद्यमान चेअरमन यांच्याकडे द्यायचे होते, असे त्यांचे म्हणणे होते. मात्र, माजी सचिवांनी ते राजीनामे स्वीकारले.