युवकाचा शॉक लागून मृत्यू
By Admin | Updated: September 2, 2014 23:18 IST2014-09-02T23:14:38+5:302014-09-02T23:18:01+5:30
रेंबवली येथील घटना : उलटसुलट चर्चेने संभ्रम

युवकाचा शॉक लागून मृत्यू
शिरगांव : देवगड तालुक्यातील रेंबवली येथील शांताराम सत्यवान वळंजू (वय २०) या युवकाचा विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाल्याची घटना १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता घडल्याची चर्चा ग्रामस्थांत आहे.
रेंबवली येथील शांताराम वळंजू (वय २०) हा सोमवारी सायंकाळी ध्वनिक्षेपकाचा माईक लावत असताना त्याला विजेचा धक्का बसला व त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची चर्चा शिरगांव दशक्रोशीत आहे. शांताराम याला हृदयविकाराचाही आजार होता. सायंकाळी अतिश्रमामुळे त्याला धाप लागली होती असेही तेथील ग्रामस्थात चर्चा होती. त्यामुळे शांतारामचा मृत्यू विजेचा शॉक लागून की हृदयविकाराच्या धक्क्याने झाला याबाबत उलटसुलट चर्चा होत असून त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही. त्याला अधिक उपचारासाठी कणकवली येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी शांतारामचा मृत्यू जागीच झाल्याचे सांगितल्याचे समजते.
ऐन गणेशोत्सवात रेंबवली येथे घडलेल्या या घटनेने गावात शोकाकुल वातावरण असून उमेदीत शांतारामचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, बहीण असा परिवार आहे. शोकाकुल वातावरणात शांतारामवर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. (प्रतिनिधी)