गणेश विसर्जनावेळी तरुणाचा मृत्यू
By Admin | Updated: September 5, 2014 23:27 IST2014-09-05T23:07:57+5:302014-09-05T23:27:41+5:30
आवळेगाव येथील घटना

गणेश विसर्जनावेळी तरुणाचा मृत्यू
कुडाळ : तालुक्यातील आवळेगाव येथील पाणवठा नदीपात्रात काल, गुरुवारी सायंकाळी गणेशमूर्ती विसर्जनासाठी गेलेल्या संतोष विठ्ठल सावंत (वय ४५, रा. गावडेकट्टा, आवळेगाव) या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. याबाबत अधिक माहिती अशी की, गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी आवळेगाव येथील श्री गणेशमूर्ती गावातील पाणवठा नदीपात्रात विसर्जनासाठी नेण्यात येतात. संतोष सावंत हे सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास गणपती विसर्जनासाठी गेले होते. यावेळी नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. रात्री उशिरापर्यंत त्यांची शोधाशोध करण्यात आली. अखेर आज, शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान त्यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला. याबाबतची माहिती आवळेगाव पोलीस दूरक्षेत्रात राजाराम गोपाळ सावंत यांनी दिली. या घटनेची कुडाळ पोलिसांत ‘आकस्मिक मृत्यू’ म्हणून नोंद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
कोयता शोधताना बुडाला
गणेशमूर्ती विसर्जन करून झाल्यानंतर संतोष हा नदीच्या पात्रातून बाहेर आला; परंतु सोबत नेलेला कोयता पाण्यात पडल्याने तो शोधण्यासाठी पुन्हा नदीपात्रात उतरला, अशी माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. संतोष सावंत याला आकडी येण्याचा त्रास होता. पाण्यात उतरल्यानंतर त्याला आकडी आली असेल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सावंतच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी व मुलगी असा परिवार आहे.