कणकवलीत मधु दंडवतेंची पुण्यतिथी
By Admin | Updated: November 12, 2014 22:56 IST2014-11-12T21:28:51+5:302014-11-12T22:56:08+5:30
कणकवली स्टेशनवर विविध संघटनांनी एकत्रित साजरी करून एक वेगळा पायंडा पाडण्याचा प्रयत्न केला

कणकवलीत मधु दंडवतेंची पुण्यतिथी
कणकवली : कोकण रेल्वेचे शिल्पकार व माजी रेल्वेमंत्री प्रा. मधु दंडवते यांची नववी पुण्यतिथी कोकण रेल्वेच्या कणकवली स्टेशनवर विविध संघटनांनी एकत्रित साजरी करून एक वेगळा पायंडा पाडण्याचा प्रयत्न केला आहे.प्रा. दंडवतेंचे स्मरण करताना स्टेशन मास्तर रंजना तांबे- माने यांनी सांगितले, दंडवतेंच्या रेल्वे मंत्रीपदाच्या कारकिर्दीत कोकण रेल्वे धावूसुद्धा लागली नव्हती, पण त्यांनी एकंदरीतच भारतीय रेल्वे कर्मचारी, प्रवासी व कोकण रेल्वेचे कर्मचारी यांच्यासाठी दाखविलेल्या व्यापक नि:स्वार्थी वृत्तीने वेगवेगळ््या संघटना व वेगवेगळ््या विभागातील बहुसंख्य कर्मचारी व प्रवाशांनीही आपले काम खंडीत न करता या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाला दाखविलेली उपस्थिती हेच प्रा. दंडवतेंनी मिळविलेले मोठे संचित आहे. आज इतक्या वर्षानंतरही रेल्वे कर्मचारी व प्रवासी त्यांना विसरलेले नाहीत, हेच यातून सिद्ध होते.
सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर म्हणाले, साधन-शुचितेचे व समाजहिताचे राजकारणच प्रा. दंडवते यांनी केल्यामुळे कोकणातील नसूनही दंडवते कोकणवासीयांच्या कायम लक्षात राहणार आहेत. राजकारण म्हणजे काय हे न कळण्याच्या वयात आम्ही त्यांचे कार्यकर्ते म्हणून काम केले याचा आम्हाला अभियान वाटतो.
प्रवासी संघटना प्रतिनिधी अशोक करंबेळकर, कर्मचारी संघटना प्रतिनिधी संजय खरीवले, संतोष कदम, कोकण रेल्वे स्टॉलधारकांच्यावतीने उमेश वाळके यांनी मनोगते व्यक्त केली. संगणक वाणिज्य वाहतूक अभियांत्रिकी आदी विविध कोकण रेल्वेचे कर्मचारी यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. रश्मी गावडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
कणकवली रेल्वे स्टेशन येथे प्रा. मधु दंडवते यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त स्टेशन मास्तर रंजना तांबे-माने, संजय मालंडकर, अशोक करंबेळकर, संजय खरीवले, संतोष कदम, उमेश वाळके आदी उपस्थित होते.