विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू

By Admin | Updated: September 16, 2014 00:36 IST2014-09-16T00:32:28+5:302014-09-16T00:36:07+5:30

आकेरी येथील घटना : ग्रामस्थांचा वीज अधिकाऱ्यांना घेराव

The death of the farmer by electric shocks | विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू

कुडाळ : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अनागोंदी व दुर्लक्षित कारभारामुळे तुटलेल्या विद्युत तारेला स्पर्श होऊन विजेचा धक्का लागल्याने आकेरी-भगतवाडी येथील शेतकरी सूर्यकांत भगवान जामदार (वय ४६) यांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीच्या विरोधात आंदोलन करीत मृतदेह उचलण्यास विरोध केला व येथील वायरमनला नोकरीवरून काढून टाका, तसेच मृताच्या कुटुंबीयांना पाच लाखांची भरपाई द्या, अशी मागणी करीत वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला.
आकेरी-भगतवाडी येथील शेतकरी सूर्यकांत जामदार व त्यांची आई गुरांच्या चाऱ्यासाठी सकाळच्या सुमारास आकेरी-तेलीवाडी येथील शेतामध्ये गेले होते. गवताचा भारा डोक्यावर घेऊन सूर्यकांत निघाले. त्यावेळी साडेअकराच्या सुमारास तेलीवाडी येथीलच रस्त्यावर तुटून पडलेल्या विद्युत तारेचा त्यांच्या हाताला स्पर्श झाला आणि विजेच्या तीव्र धक्क्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तेलीवाडी येथील विद्युत वाहिनी तारा तुटल्या असल्याची माहिती तेथील वायरमन शब्बीर शहा यांना कोणीतरी दूरध्वनीवरून दिली होती. फ्यूज बंद करून कुठे तारा तुटल्या आहेत याची पाहणी करण्यासाठी ते आले असता त्यांना सूर्यकांतचा मृतदेह दिसून आला. त्यांनी याबाबतची माहिती माजी उपसरपंच प्रेमानंद बांदेकर यांना दिली आणि ग्रामस्थांच्या भीतीने शहा यांनी तेथून पलायन केले.
वीज कंपनीच्या गलथान कारभारामुळे सूर्यकांत यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी घटनास्थळी आंदोलन केले. घटना समजताच जिल्हा परिषद अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रकाश मोरये, उपसभापती आर. के. सावंत, बबन बोभाटे, तसेच तालुक्यातील सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी वीज कंपनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. पाच ते सहा तास आंदोलनामुळे मृतदेह ताब्यात घेतला नव्हता. याप्रकरणी कुडाळ पोलीस सहायक निरीक्षक आर. पी. पवार तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The death of the farmer by electric shocks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.