कुर्लीतील जखमी सांबराचा अखेर मृत्यू

By Admin | Updated: September 4, 2014 23:28 IST2014-09-04T23:08:27+5:302014-09-04T23:28:58+5:30

वनरक्षक, वनपाल यांचा संप : मुक्या प्राण्याला गमवावा लागला जीव

The death of Acharya after death in Kurli | कुर्लीतील जखमी सांबराचा अखेर मृत्यू

कुर्लीतील जखमी सांबराचा अखेर मृत्यू

कणकवली : कुर्ली भातडेवाडी येथे डोंगरालगतच्या मानवी वस्तीत जखमी अवस्थेत शिरलेल्या सांबराचा गुरुवारी जानवली येथील वन विभागाच्या कार्यालयात अखेर मृत्यू झाला. वनरक्षक तसेच वनपालांच्या संपामुळे या जखमी सांबरावर वेळीच उपचार होऊ शकले नाहीत. त्यामुळे या मुक्या प्राण्याला जीव गमवावा लागला. त्यामुळे या घटनेबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.
कुर्ली गावच्या पूर्व दिशेस दाजीपूर अभयारण्य आहे. या अभयारण्यात गवा रेडे, हरिण, सांबर, बिबटे आदी वन्य प्राणी आढळून येतात. बुधवारी कुर्ली भातडेवाडी या डोंगरालगतच्या नर जातीच्या सांबरावर चार ते पाच रानकुत्र्यांनी (कोळसुंद्ये) जोरदार हल्ला केला. या रानकुत्र्यांपासून जीव वाचविण्यासाठी ते सांबर मानवी वस्तीत शिरले. हे सांबर दीपक कदम तसेच चंदू कदम यांच्या दृष्टीस पडले. त्यांनी इतर ग्रामस्थांना बोलावून घेतले. तसेच त्या सांबराची रानकुत्र्यांच्या तावडीतून सुटका केली. शाहू कदम, बाबू कदम आदी ग्रामस्थांनी त्या सांबराला दोरखंडाच्या सहाय्याने झाडाला बांधून ठेवले होते. सरपंच अंबाजी हुंबे, उपसरपंच सूर्यकांत पाटील, पोलीस पाटील प्रदीप पाटील आदी ग्रामस्थांनीही घटनास्थळी धाव घेतली. या जखमी सांबराचे एक शिंग मोडून पडले होते. तर पुढच्या पायाला व मानेखाली जखम झाली होती. मागच्या दोन्ही पायांनाही रानकुत्र्यांनी चावा घेतल्याने ते रक्तबंबाळ झाले होते. या घटनेबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. मात्र, वन मजूरांव्यतिरिक्त तेथे कोणीही फिरकले नाहीत.
वनरक्षक तसेच वनपालांचा संप असल्यामुळे ते याठिकाणी आले नसल्याचे समजते. जखमी अवस्थेतील सांंबरावर गुरुवारी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार केले. ग्रामस्थांच्या मदतीने वनमजूरांनी या सांबराला डोंगरमय भागातून खाली आणून ट्रॅक्टरमध्ये घातले. तसेच दुपारी २ वाजण्याच्या सुमारास कणकवली शहरानजिक असलेल्या जानवली येथील वनविभागाच्या कार्यालयात आणले. मात्र, काही वेळातच या सांबराचा मृत्यू झाला. या सांबराचे शुक्रवारी शवविच्छेदन केल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दरम्यान, या जखमी सांबरावर वेळीच उपचार झाले असते तर त्याचे प्राण वाचले असते. वन्यप्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असताना मानवी चुकांमुळे वन्य प्राण्यांना जीवास मुकावे लागत असल्याने कणकवली तालुक्यासह परिसरातील ग्रामस्थांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)

Web Title: The death of Acharya after death in Kurli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.