दहा वर्षातच दापोली तालुका ‘मोबाईल हब’

By Admin | Updated: July 14, 2015 21:47 IST2015-07-14T21:47:21+5:302015-07-14T21:47:21+5:30

ट्रायचे सर्वेक्षण : सध्या अडीच ते तीन लाख लोकांच्या हाती मोबाईल

Dapoli taluka 'mobile hub' in ten years | दहा वर्षातच दापोली तालुका ‘मोबाईल हब’

दहा वर्षातच दापोली तालुका ‘मोबाईल हब’

दापोली : दापोलीकरांची अनेक वर्षांची मागणी फळाला आली व १२ जुलै २००४ रोजी दापोली शहरात बीएसएनएलच्या मोबाईलची पहिली अधिकृत ट्रिंग ट्रिंग वाजली. याआधी दापोली शहरात कोणत्याही मोबाईल कंपनीची सेवा नव्हती. या घटनेला याच महिल्यात तब्बल दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. या दहा वर्षात दापोलीही मोबाईल हब झाल्याचे चित्र ट्रायच्या सर्वेक्षणातून पुढे आले आहे.ट्रायच्या आकडेवारीनुसार दापोली तालुक्यात सध्या अडीच ते तीन लाख मोबाईल ग्राहक आहेत. १२ जुलै २००४ हा दिवस दापोलीकरांकरिता मैलाचा दगड ठरला. या दिवशी दापोली शहरात अनेक दिवसांपासून उभ्या असणाऱ्या परंतु रेंज नसल्याने कार्यान्वित नसणारा गोपाळकृष्ण सोहनी विद्यामंदिरसमोरील टॉवर सायंकाळच्या सुमारास अचानक कार्यान्वित करण्यात आला. यामुळे ज्यांचे मुंबई, पुणे, रत्नागिरी व अन्य मोठ्या शहरांत जाणे-येणे होते व यामुळे ज्यांच्याकडे बीएसएनएल किंंवा एमटीएनएलचे सीमकार्ड असणारे मोबाईल होते, ते अचानक खणखणायला लागले. यामुळे अनेकांनी सीमकार्डकरिता बीएसएनएलच्या कार्यालयात धाव घेतली. ज्यादिवशी बीएसएनएलने दापोली कार्यालयातून आपल्या पहिल्या सीमकार्डचे वितरण केले, त्या दिवशी पहाटेपासून बीएसएनएलच्या कार्यालयात रांगा लागल्या. काहीजण रात्रीपासून या कार्यालयाच्या पायरीवर सीमकार्डकरिता येऊन झोपले होते.
दापोली बीएसएनएलच्या इतिहासात पहिल्या दिवशी वितरित झालेल्या पहिल्या सीमकार्डचा नंबर ९४२२०५४१६१ होता.
बीएसएनएलनंतर टाटा, आयडिया, एअरटेल आणि २००६ साली वोडाफोन, त्याच्या पश्चात रिलायन्स, डोकोमो व युनिनॉर आदी कंपन्यांचे दापोलीत आगमन झाले.
आज ट्रायच्या नोंदणीनुसार दापोली शहराची लोकसंख्या ५१ हजार आहे. या ५१ हजारात दापोली शहरात वोडाफोनचे ७, बीएसएनएलचे ६, आयडियाचे ४ व टाटाचे ३ टॉवर अहोरात्र दापोलीकरांना सेवा देतात. दापोलीत १२ जुलै २००४पूर्वी ज्यांनी मोबाईल विकत घेतले होते व ज्यांनी दुसऱ्या शहरांतून सीमकार्ड मिळवली होती, त्यांना दापोली शहरात रेंज मिळत नव्हती. मग हे मोबाईलप्रेमी त्यांच्या सवडीने दापोलीच्या पश्चिमेला चंद्रनगर गावाच्या हद्दीवर असणाऱ्या डोंगरांवर जात असत. याठिकाणी खेड तालुक्यातील कशेडी येथील टॉवरची रेंज मिळत असे. (प्रतिनिधी)

दापोलीत सध्या मोबाईल हॅन्डसेट, मोबाईल कव्हर, हेडफोन, स्क्रीनसेव्हर, रिचार्ज व्हाऊचर व अन्य मोबाईलशी संबंधित सामानाला मोठी मागणी आहे. ही मागणी जिल्ह्यातील चिपळूण, खेड, मंडणगड, गुहागर व रायगड जिल्ह्यातील महाड शहरापेक्षादेखील अधिक आहे.
-प्रसाद फाटक,
मोबाईल विक्रेते, दापोली

Web Title: Dapoli taluka 'mobile hub' in ten years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.