दापोली, चिपळूण, खेड, गुहागर स्वच्छ
By Admin | Updated: October 1, 2015 00:35 IST2015-09-30T22:56:13+5:302015-10-01T00:35:03+5:30
२ आॅक्टोबर महात्मा गांधी जयंतीदिनी सन्मान करण्यात येणार आहे. दापोली नगरपंचायतीने शासनाच्या विविध उपक्रमात भाग घेऊन यापूर्वी अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत.

दापोली, चिपळूण, खेड, गुहागर स्वच्छ
शिवाजी गोरे-दापोली नगरपंचायतीने यशाची परंपरा कायम राखत शहरातील घनकचऱ्याचे व्यवस्थापन करून स्वच्छ महाराष्ट्र अभियानाला हातभार लावला आहे, त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, चिपळूण, खेड, गुहागर या शहरांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह देऊन २ आॅक्टोबर महात्मा गांधी जयंतीदिनी सन्मान करण्यात येणार आहे.
दापोली नगरपंचायतीने शासनाच्या विविध उपक्रमात भाग घेऊन यापूर्वी अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने २००८-०९ साली संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान प्रोत्साहनपर पुरस्कारप्राप्त, २००९ - १० यावर्षी संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान - कोकण विभागीय प्रथम (१० लाख रुपये) पुरस्कार, पर्यावरण विभागाचा २०१२ चा वसुंधरा पुरस्कार (राज्यात तृतीय) पुरस्कार पटकावून पुरस्काराचा आलेख चढता राखला आहे. दापोलीचे तत्कालीन मुख्याधिकारी रामदास कोकरे, नगराध्यक्षा प्रियंका अमृते यांनी शहरात संपूर्ण प्लास्टिक बंदी, शहर कचराकुंडीमुक्त व घनकचऱ्याचे नियोजन केले होते. कोकरे यांनी शहर प्लास्टिकमुक्त करून दापोली नगरपंचायतीचे नाव संपूर्ण राज्यात नेले होते.(प्रतिनिधी)
दापोली नगरपंचायत हागणदारीमुक्त शहर असून, शहरात कोणीही उघड्यावर शौचास बसत नाही. शहरातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट व घनकचरा नियोजन करण्यात आला आहे.
- जावेद मणियार,
नगराध्यक्ष, दापोली