गुणवत्तेवरून खडाजंगी
By Admin | Updated: July 16, 2014 00:25 IST2014-07-16T00:24:00+5:302014-07-16T00:25:02+5:30
स्थायी समिती सभा : दोषी शिक्षकांवर कारवाई करण्याचा ठराव

गुणवत्तेवरून खडाजंगी
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील गुणवत्तेचे तीनतेरा वाजले असल्याचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदेश सावंत यांनी उदाहरणासह सभागृहात मांडताच सभागृहातील सर्वजण चक्रावून गेले. गुणवत्ता या विषयावरून सभागृहात चांगलीच खडाजंगी झाली.
अखेर गुणवत्ता ढासळायला शिक्षकच जबाबदार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी स्पष्ट करीत गुणवत्ता तपासणीसाठी निश्चित केलेली पथके पुन्हा कार्यरत करत ज्या शाळांची गुणवत्ता चांगली नसेल अशा शाळेतील शिक्षकांना दोषी ठरवत त्यांच्यावर कारवाई करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंगळवारच्या सभेत घेण्यात आला.
जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते यांच्या अध्यक्षतेखाली बॅ. नाथ पै सभागृहात झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदेश सावंत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील रेडकर, समिती सभापती प्रकाश कवठणकर, भगवान फाटक, अंकुश जाधव, श्रावणी नाईक, समिती सदस्य सतीश सावंत, रेवती राणे, गुरूनाथ पेडणेकर, संजय बोबडी, पुष्पा नेरूरकर, समिती सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, अधिकारी व खातेप्रमुख उपस्थित होते.
सभेच्या सुरूवातीला वित्त व बांधकाम सभापती यांचे स्वीय सहाय्यक विकास पाटकर यांना सभागृहाने श्रद्धांजली वाहिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेबाबत स्थिती काय आहे? अशी विचारणा उपाध्यक्ष सावंत यांनी शिक्षणाधिकारी धाकोरकर यांच्याकडे केली. यावर शिक्षणाधिकाऱ्यांनी बेरीज, वजाबाकी गणिते सोडविण्यात मुले मागे पडतात, अशी कबुली दिली. यावर आक्रमक भूमिका घेत संदेश सावंत यांनी आम्हाला आलेला अनुभव हा वाईट आला, असे सांगत चक्क उदाहरणे द्यायला सुरूवात केली. सावंत म्हणाले, जिल्हा परिषदेच्या एका शाळेत गेलो असता तेथील मुलांना एक साधे तीन अंकी वजाबाकीचे गणित घातले. त्यातील १० पैकी केवळ एका विद्यार्थ्याने गणित सोडविले. उर्वरित काहीजणांना तर वजाबाकी व बेरीजमधील फरकच कळला नाही. त्यांनी चक्क ते गणित बेरीजमधून सोडवले. मात्र, तसे करूनही त्याचे उत्तर चुकले ही मोठी शोकांतिका आहे. असे सांगत सावंत यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना धारेवर धरले. (प्रतिनिधी)