पवनचक्कीमुळे नाचक्की
By Admin | Updated: July 2, 2015 22:47 IST2015-07-02T22:47:30+5:302015-07-02T22:47:30+5:30
दापोली नगरपंचायत : सहा महिने चक्कीतून फक्त वाराच

पवनचक्कीमुळे नाचक्की
आंजर्ले : दापोली नगरपंचायतीचा पवनचक्कीपासून वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प गेले सहा महिने बंद आहे. दापोली नगरपंचायतीने अपारंपरिक ऊर्जा निर्मितीसाठी चार वर्षांपूर्वी पवनचक्की प्रकल्प राबवला. तत्कालीन मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी यासाठी पुढाकार घेतला होता.केंद्र शासनाकडून यासाठी निधी आणण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने प्रयत्न केले होते. या पवनचक्कीतून तयार होणाऱ्या विजेतून नगरपंचायत कार्यालयातील विजेची गरज भागविली जाणार होती. यासाठी तब्बल ५५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. यातील ९० टक्के निधी केंद्र शासनाकडून, तर १० टक्के निधी नगरपंचायत फंडातून उभारण्यात आला. या प्रकल्पाचा ठेका सोहा पॉवरला देण्यात आला. याअंतर्गत नगरपंचायत कार्यालयाच्या आवारात पाच पवनचक्क्या उभारण्यात आल्या. दापोली शहर समुद्र सपाटीपासून उंचावर असल्यामुळे पवनचक्कीसाठी आवश्यक वाऱ्याचा वेग विनासायास उपलब्ध आहे. सुरूवातीला हा प्रकल्प व्यवस्थित चालला. मात्र, आता सहा महिन्यांपासून हा प्रकल्प बंद आहे. वाऱ्याच्या वेगामुळे पवनचक्क्या नुसत्याच फिरत आहेत. मात्र, वीजनिर्मितीची बोंबाबोंब आहे. त्यामुळे हा प्रकल्प फक्त शोभेसाठीच उरला आहे.
याबाबत ‘लोकमत’ने प्रशासनाशी संपर्क साधला असता तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकल्प बंद असल्याचे सांगण्यात आले. येत्या काही दिवसात निर्माण झालेला तांत्रिक बिघाड दूर केले जाणार आहेत. त्यानंतर या पवनचक्कीमार्फत वीजनिर्मिती पुन्हा सुरू होईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले. सहा महिन्यांपूर्वी ५५ लाख रुपये खर्चून उभारलेला प्रकल्प सुरू करण्यासाठी का विलंब केला गेला? असा सवाल दापोलीकरांकडून उपस्थित केला जात आहे. (प्रतिनिधी)
नगरपंचायतीने स्वीकारला पर्याय
कोकणात अपारंपरिक स्रोतांच्या माध्यमातून ऊजार्निर्मिती करण्याचा पर्याय स्वीकारण्यात आला. काही ठिकाणी ते यशस्वी झाले तर काही ठिकाणी अखेरच्या घटका मोजू लागलेत. दापोली नगरपंचायतीने हा पर्याय स्वीकारून पवनऊर्जा निर्मितीचा प्रकल्प हाती घेतला. सुरूवातीला काही काळ तो यशस्वीही झाला. मात्र, नंतर तो तांत्रिक बिघाडामुळे बंद पडल्याचे सांगण्यात येत आहे. हा प्रयोग आता यशस्वी होणार काय...