धरण दुरुस्ती अधांतरीच!
By Admin | Updated: November 16, 2014 23:49 IST2014-11-16T21:58:28+5:302014-11-16T23:49:07+5:30
पानवलचे दुर्दैव : तीन वर्षांपूर्वीच पाटबंधारेकडे प्रस्ताव

धरण दुरुस्ती अधांतरीच!
रत्नागिरी : रत्नागिरी शहराला गेल्या ४९ वर्षांपासून गुरुत्वबलाद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या पानवल धरणाच्या नव्याने उभारणीचा वा दुरुस्तीचा प्रश्न अद्यापही अधांतरीच आहे. सध्या अस्तित्वात असलेले हे धरण खचलेले असून त्याला जमिनतळाशी मोठ्या प्रमाणात गळती आहे. त्यामुळे या धरणाच्या दुरुस्तीची गरज निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे या कामासाठी २०१२ मध्ये पालिकेने १ कोटी ५८ लाख रुपयांचा तयार केलेला प्रस्ताव पाटबंधारे विभागाकडे पाठविण्यात आला असून त्याबाबत अद्यापही गतीने हालचाली होत नसल्याने धरण दुरुस्तीचा प्रश्न रखडला आहे. आता हाच खर्च अडीच ते तीन कोटीपर्यंत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रत्नागिरी शहराला १९६५ पासून हातखंबाजवळ असलेल्या पानवल धरणातून पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी कॉँक्रीटथर असलेली लोखंडी जलवाहिनी टाकण्यात आली आहे. या धरणाप्रमाणेच गेल्या दोन दशकांपासून रत्नागिरी शहराला शीळ धरणातून मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा केला जातो. मात्र शीळ धरणातील पाणी उपसा करून ते रत्नागिरी शहरात पोेहोचविण्यासाठी प्रत्येक महिन्याला १५ ते २० लाख रुपये हे विजेसाठी खर्च करावे लागतात. मात्र पानवल धरणातील पाणी हे गुरुत्वबलाद्वारे शहराला पुरविले जाते. त्यामुळे या पाणीपुरवठ्यासाठी विजेचा खर्च नाही. सध्या या धरणातून शहराला २ ते ३ एमएलडी पुरविले जाते. त्याचबरोबर नाचणे तलावातूनही शहराला अर्धा एमएलडी पाण्याचा पुरवठा केला जातो. पानवल धरण व नाचणे तलावाच्या दुरुस्तीची गरज गेल्या काही वर्षांपासून असतानाही ही कामेच झालेली नाहीत.
या दोन्ही कामांचा १ कोटी ५८ लाखांचा प्रस्ताव पालिकेने जीवन प्राधिकरणमार्फत पाटबंधारे खात्याकडे पाठविला होता. त्याबाबतच्या कागदपत्रांची पुर्तता अद्यापही सुरूच आहे. त्यामुळे या कामाला विलंब झाल्याने आता या दुरुस्ती कामाचे फेरमुल्यांकन करून वाढीव खर्चाचे अंदाजपत्रक द्यावे लागणार आहे. हा वाढीव खर्च आता अडीच ते तीन कोटींवर जाणार आहे. त्यामुळे दुरुस्तीच्या कामाचा हा खेळ अजून किती काळ सुरू राहणार असा प्रश्न यानिमित्ताने विचारण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
पानवलला समांतर जलवाहिनी आवश्यक
रत्नागिरीनजीकच असलेल्या या पानवल धरणावरून रत्नागिरीकडे येणारी जलवाहिनी ही तब्बल ४९ वर्षांची जुनी असून आता जागोजागी फुटण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे या अस्तित्वात असलेल्या जलवाहिनीचा वापर करण्याबरोबरच या जलवाहिनीस दुसरी नवीन समांतर जलवाहिनी उभारणे आवश्यक आहे. त्यासाठीही गेल्या काही वर्षांपासून पालिकेत केवळ चर्चा होत आहे. या जलवाहिनीसाठी सहा कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पावसाळ्यात अधिक पाणी उचलणे शक्य
पानवल धरणाची दुरुस्ती न झाल्यास हे धरण पाण्यातच कोसळण्याची भीतीही आहे. त्यामुळे तातडीने या धरणाची दुरुस्ती होणे आवश्यक आहे. ही दुरुस्ती झाल्यास पावसाळ्यात या धरणातून अधिक प्रमाणात पाणी उचलणे शक्य होईल. त्यामुळे शीळ धरणातून कमी पाणी उचलावे लागेल. परिणामी विजेच्या बिलात घट होऊन पालिकेचे पैसे वाचतील, असेही पालिका सूत्रांकडून सांगण्यात आले.
रत्नागिरी शहराला १९६५ पासून हातखंबाजवळ असलेल्या पानवल धरणातून पाणीपुरवठा.
२०१२ मध्ये पालिकेने १ कोटी ५८ लाख रुपयांचा तयार केलेला प्रस्ताव पाटबंधारे विभागाकडे सादर.
अद्यापही गतीने हालचाली होत नसल्याने धरण दुरुस्तीचा प्रश्न रखडला.