उपरकर यांच्यावरील टीकेला दाभोलकर यांचे जोरदार प्रत्युत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 03:37 PM2020-07-27T15:37:59+5:302020-07-27T15:40:29+5:30

प्रेमानंद देसाई तसेच पदाधिकाऱ्यांना मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यावर टीका करण्याचा कोणताही अधिकार नाही, असा टोला मनसेचे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांनी लगावला आहे.

Dabholkar's strong response to Uparkar's criticism | उपरकर यांच्यावरील टीकेला दाभोलकर यांचे जोरदार प्रत्युत्तर

उपरकर यांच्यावरील टीकेला दाभोलकर यांचे जोरदार प्रत्युत्तर

googlenewsNext
ठळक मुद्देप्रेमानंद देसाई यांच्या परशुराम उपरकर यांच्यावरील टीकेला जोरदार प्रत्युत्तरस्वयंघोषित नेत्यांना टीकेचा अधिकार नाही : राजन दाभोलकर

कणकवली : ज्या सरपंच संघटनेला घटनेत कोणताही कायदेशीर आधार नाही, अशा स्वयंघोषित संघटनेचे अध्यक्ष प्रेमानंद देसाई तसेच पदाधिकाऱ्यांना मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यावर टीका करण्याचा कोणताही अधिकार नाही, असा टोला मनसेचे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांनी लगावला आहे.

त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोरोनाच्या काळात राज्य व केंद्र सरकार आणि जिल्हा प्रशासन यांनी कोणाला क्वारंटाईन करायचे तसेच दुकानबंदी, कंटेन्मेंट झोन मर्यादा, लोकांना दंड करणे वगैरे निर्णय घ्यायचे आहेत. नाशिकमध्ये व्यापारी व ग्रामपंचायतीने तसे निर्णय परस्पर घेतले होते. त्या विरोधात उच्च न्यायालयाने १३ जुलै २०२० रोजी तसे निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार ग्रामपंचायतींना नाही असा निर्णय दिलेला आहे.

त्या निर्णयाचा अभ्यास स्वयंघोषित सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रेमानंद देसाई यांनी करावा.
तसेच कोरोनाच्या या काळात बाधितांना क्वारंटाईन करणे, त्याचा प्रादुर्भाव इतरत्र होऊ नये म्हणून आवश्यक नियमावली तयार करणे, टाळेबंदी करणे किंवा लॉकडाऊन करणे हे सर्व निर्णय घेण्याचा अधिकार केवळ केंद्र व राज्य सरकार यांना आहेत.

ते अधिकार ग्रामपंचायतींना दिलेले नाहीत, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोणत्याही सरपंचांच्या संघटनांनासुद्धा अशाप्रकारचे निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार नाही. या निर्णयाचा अभ्यास प्रेमानंद देसाई यांनी करावा.

त्याचप्रमाणे स्वयंघोषित अशा विशिष्ट सरपंच संघटनेतर्फे ते निर्णय घेत आहेत. परंतु अशा सरपंच संघटना जिल्ह्यात किती आहेत? ते सुद्धा त्यांनी जाहीर करावे. नुसती पत्रकबाजी करून स्वत: नेता असल्याचे भासविण्याचा प्रयत्न करू नये.

प्रेमानंद देसाई यांनी त्यांच्या केर गावातील पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील रस्ता माती उत्खननामुळे ढासळल्याने शिरवलमार्गे जाणारा रस्ता भर पावसात बंद झाला आहे. त्यामुळे लोकांची गैरसोय झाली व त्यातील माती धरणात गेली. त्या गावातील समस्येकडे दुर्लक्ष करून जगाच्या उठाठेवी करण्यापेक्षा स्वत:च्या गाव विकासाकडे लक्ष द्यावे.

शिरवल व केरमधल्या काही जमिनी बोगस माणसे दाखवून खरेदी करण्यात आल्या आहेत. ते शोधून जमीनदारांच्या पाठीशी उभे राहून मनसे जमिनी खरेदी करणाऱ्यांची पोलखोल केल्याशिवाय राहणार नाही.

सरपंच हे पद गावातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी निर्माण केलेले असते. त्यामुळे सरपंचांकडून तसे काम कितपत होते? हेही देसाई यांनी सांगावे, असेही दाभोलकर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Web Title: Dabholkar's strong response to Uparkar's criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.