उत्सुकता अवघ्या राज्याला

By Admin | Updated: October 17, 2014 22:54 IST2014-10-17T22:00:03+5:302014-10-17T22:54:26+5:30

नाराज राष्ट्रवादी व भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची मते विजयी उमेदवारांसाठी निर्णायक

Curiously the only state | उत्सुकता अवघ्या राज्याला

उत्सुकता अवघ्या राज्याला

रजनीकांत कदम - कुडाळ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. कारण या मतदारसंघातून पुन्हा एकदा काँग्रेसचे राज्याचे प्रचार प्रमुख व ज्येष्ठ नेते नारायण राणे हे रिंगणात असून, या मतदारसंघातील वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीमुळे कोणाचे विजयाचे फटाके फुटणार, याची उत्सुकता जिल्ह्यातीलच नव्हे, तर राज्यातील मतदारांना लागून राहिली आहे. सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जवळ जवळ शेवटच्या टप्प्यात आली असून, आता फक्त निकालाकडे लक्ष लागून राहिले आहे. कुडाळ मतदारसंघातून ६८.५८ टक्के एवढे मतदान झाले आहे. लोकसभेत हेच मतदान ६६ टक्के होते. म्हणजेच दोन टक्क्यांनी यावेळी निवडणुकीत वाढ झाली आहे. या मतदारसंघातून काँग्र्रेसकडून नारायण राणे, शिवसेनेकडून वैभव नाईक, राष्ट्रवादीकडून पुष्पसेन सावंत, भाजपकडून विष्णू मोंडकर, बसपाकडून रवींद्र कसालकर, अपक्ष म्हणून स्नेहा केरकर असे सहा उमेदवार रिंगणात उभे राहिले आहेत. कुडाळ मतदारसंघामध्ये मालवण व कुडाळ हे दोन तालुके येतात. या मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या २ लाख ४ हजार ८०४ एवढी आहे. यामध्ये पुरुष १ लाख ७०६, तर महिला उमेदवार १ लाख ४० हजार ९९ मतदार आहेत. या निवडणुकीत येथील १ लाख ४० हजार ४५८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून ६६ टक्के मतदान झाले होते. या विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र लोकसभेपेक्षा दोन टक्क्यांनी अधिक मतदान झाले. या मतदारसंघातून सर्व पक्ष स्वतंत्र लढत असल्यामुळे या ठिकाणी अपक्ष मिळून सहा उमेदवार असले, तरी या मतदारसंघातील मुख्य लढत ही काँगे्रेसचे नारायण राणे व शिवसेनेचे वैभव नाईक यांच्यातच मुख्यत्वे होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कुडाळ मतदारसंघातील कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यात टाळंबा, आकारीपड, वनसंज्ञा तसेच कुडाळ येथील बंद एमआयडीसी, तसेच प्रकल्पग्रस्त, तर मालवण तालुक्यातील मच्छिमारांचे प्रश्न, सी-वर्ल्ड प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अशा प्रलंबित प्रश्नांवरच मोठ्या प्रमाणात प्रचार झाला असून, सर्व उमेदवारांकडून हे प्रश्न सोडविण्याची आश्वासने येथील मतदारांना देण्यात आली आहेत. याठिकाणी राष्ट्रवादी, भाजपा स्वतंत्र लढत असले, तरी काही नाराज राष्ट्रवादी व भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची मते विजयी उमेदवारांसाठी निर्णायक ठरणार आहेत. या निवडणुकीत या मतदारसंघातून राष्ट्रवादी व भाजप पक्षाचा प्रभाव अत्यंत कमी प्रमाणात दिसला. आपलाच उमेदवार निवडून येणार असल्याचा विश्वास काँग्रेस व शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना असल्याने दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते विजयाच्या जल्लोषासाठी आतापासूनच तयारीला लागले आहेत.

Web Title: Curiously the only state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.