राणेंच्या गौप्यस्फोटाबाबत उत्सुकता
By Admin | Updated: July 18, 2014 23:14 IST2014-07-18T23:06:00+5:302014-07-18T23:14:46+5:30
राजकीय वातावरण तापले : जिल्ह्यात आगमन, दोन दिवसांचा दौरा

राणेंच्या गौप्यस्फोटाबाबत उत्सुकता
महेश सरनाईक : कणकवली
गेली २५ वर्षे सिंधुदुर्ग आणि कोकणच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलेले नारायण राणे सोमवारी कोणता निर्णय घेतात, याबाबतची उत्सुकता आता सिंधुदुर्गातील जनतेबरोबरच सर्वच राजकीय पक्षांना लागली आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांचा दौरा करून नारायण राणे शुक्रवारी रात्री कणकवलीत दाखल झाले असून शनिवारी ते प्रत्येक तालुक्यात भेटीगाठींचा कार्यक्रम करणार आहेत. त्यामुळे राणेंच्या आगामी वाटचालीबाबतच्या चर्चेने सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
गेली २५ वर्षे सिंधुदुर्गच्या राजकारणात नारायण राणे यांचा मोठा दबदबा राहिला आहे. सध्यस्थितीत जिल्ह्यातील ७0 टक्के सत्तास्थाने राणेंच्या अधिपत्याखाली आहेत. त्यामुळे कोणताही राजकीय निर्णय घेताना राणे यांना येथील जनतेला पर्यायाने त्यांच्या समर्थक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे नारायण राणे आपल्या राजकीय जीवनातील नवीन निर्णय घेण्यापूर्वी येथील समर्थकांना भेटण्यासाठी आजपासून जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात ते शक्तीप्रदर्शन करणार असून यातूनच आपल्या मागे असलेल्या कार्यकर्त्यांना आवाहन करूनच ते सोमवारी भूमिका जाहीर करणार आहेत.
दहा वर्षांपूर्वी नारायण राणे यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळीदेखील त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी सिंधुदुर्गातील आपल्या समर्थकांसमवेत बैठका घेतल्या होत्या. त्यांना आपल्यावर शिवसेना पक्षनेतृत्वाने त्यावेळी केलेल्या अन्यायाबाबत माहिती दिली होती. तसेच कार्यकर्त्यांची सहानुभूती मिळविल्यानंतरच त्यांनी काँग्रेसमध्ये दिमाखदार प्रवेश केला होता. तसेच त्यावेळी त्यांच्यासमवेत त्यांच्या समर्थक आमदारांनाही काँग्रेसमध्ये प्रवेश घडवून आणला होता.
त्यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत त्यांनी काँग्रेसला यश मिळवून दिले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या मुलाचा म्हणजे खासदार नीलेश राणे यांचा झालेला दारूण पराभव झाल्यानंतर ते व्यथीत झाले होते. त्यातच काँग्रेस नेतृत्वाने त्यांना मुख्यमंत्री बनविणार असल्याचा दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे ते नाराज आहेत. येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला यश मिळवायचे असेल तर काही धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. मात्र, तसे कोणतेही निर्णय काँग्रेस पक्षाकडून घेतले जात नसल्यानेच नाराज नारायण राणे सोमवारी मंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत. त्यानंतर ते आपली भूमिका जाहीर करणार आहेत. त्यामुळे त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे