मगरीच्या हल्ल्यात पेडणेकरचा मृत्यू ?
By Admin | Updated: September 5, 2014 23:33 IST2014-09-05T22:08:01+5:302014-09-05T23:33:15+5:30
आठवड्यापूर्वी बेपत्ता : तळवणे येथील प्रकार

मगरीच्या हल्ल्यात पेडणेकरचा मृत्यू ?
सावंतवाडी: तळवणे पेडणेकरवाडी येथून बेपत्ता झालेल्या महादेव जयराम पेडणेकर (४०) यांचा मृतदेह वेळवेवाडी खारबंधारा येथे छिन्नविछिन्न अवस्थेत गुरूवारी दुपारी आढळून आला आहे. पोलीस उपनिरीक्षक दाजी वारंग यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, त्या मृतदेहाचे मुंडके तसेच हात पाय गायब झाले होते. या परिसरात मोठ्या प्रमाणात मगरींचे वास्तव्य असल्याने मगरींच्या हल्ल्यातच पेडणेकर यांचा मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
याबाबत माहिती अशी की, महादेव पेडणेकर हे मुंबई येथे वास्तव्यासाठी असतात. २७ आॅगस्ट रोजी आपल्या तळवणे या गावी आले होते. तर २८ रोजी आरोंदा येथे गणपती बाजारासाठी गेले होते. तेथून ते आपल्या मित्रासमवेत रात्रीच्या सुमारास घरी परतत होते. त्यांच्या घराजवळ एक ओहोळ आहे. त्या ओहोळावर मोठ्या प्रमाणात पाऊस असल्याने तीन फुटापर्यंत पाणी होते. त्या ओहोळावरून पाय घसरून ते खाली कोसळले.
तर त्यांच्यासोबत असलेला मित्र हा घरी गेला. त्यावेळी पेडणेकर पाण्याच्या प्रवाहात ओहोळात पाय घसरून पडले, हे त्यांच्या मित्राच्या लक्षात आले नाही.
दुसऱ्या दिवशी महादेव हा घरी न आल्याने सर्वत्र शोधाशोध करण्यात आली. येथील पोलीस ठाण्यात महादेव यांच्या बेपत्ताची तक्रार नातेवाईकांनी दिली. त्यावरून पोलिसांनी तपास सुरू केला. त्यांच्यासोबत असलेल्या मित्रांचीही पोलिसांनी चौकशी केली. पण त्यात काहीही निष्पन्न झाले नाही. गेला आठवडाभर पोलीस तसेच नातेवाईक महादेव यांचा शोध घेत होते. पोलिसांनी महादेव यांच्या बेपत्ता होण्यामागचे गूढ उलगडण्यासाठी बरेच प्रयत्न केले होते.
अखेर गुरूवारी दुपारच्या सुमारास तळवणे सरपंच मिलींद कांबळी यांना तळवणे वेळवेवाडी येथून बांद्याकडे जाणाऱ्या खारबंधारा येथे एका अनोळखी पुरूषाचा मृतदेह अडकून पडलेल्या अवस्थेत आढळून आला. या मृतदेहाचे मुंडके तसेच हात पायही नव्हते. फक्त एक पॅन्ट अंगावर होती. त्यांनी याबाबत तातडीने सावंतवाडी पोलिसांना माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक दाजी वारंग यांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली असता, मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला.
पेडणेकर यांच्या नातेवाईकांनी जशी माहिती दिली होती. तसेच वर्णन मृतदेहाशी जुळून येत होते. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ओहोळातून बाहेर काढला. मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले आणि मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
दरम्यान पोलीस उपनिरीक्षक दाजी वारंग यांनी दिलेल्या माहितीनुसार तळवणे वेळवेवाडी येथील खारबंधारा परिसरात मोठ्या प्रमाणात मगरीचा वावर आहे. महादेव ओहोळात पडल्यानंतर मगरींनी पाण्यात ओढून नेले असावे. महादेव पाण्यात पडला ती वेळ रात्रीची असल्याने त्यांना कोणाताही प्रतिकार करता आला नसावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)