भाषा विषयासाठी आता कृ तीपत्रिका
By Admin | Updated: July 2, 2015 00:30 IST2015-07-01T22:53:52+5:302015-07-02T00:30:56+5:30
कृष्णकुमार पाटील : गुणवत्तावाढीसाठी शिक्षण मंडळाचा निर्णय

भाषा विषयासाठी आता कृ तीपत्रिका
आनंद त्रिपाठी - वाटुळ -शैक्षणिक वर्ष २०१५-१६ पासून शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व विकास करण्याच्या दृष्टीने इंग्रजी भाषा विषयाप्रमाणेच मराठी, हिंदी, संस्कृत या भाषा विषयांना कृ तीपत्रिकेप्रमाणे मूल्यमापन योजना लागू करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी दिली आहे.
भाषा विषय म्हटले की, आठ ते दहा ओळीत उत्तरे लिहा, कारणे सांगा, संदर्भासह स्पष्टीकरण अशा प्रश्नांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत असे. परंतु या शैक्षणिक वर्षापासून एकही प्रश्नचिन्ह नसलेली कृतिपत्रिका विद्यार्थ्यांच्या हाती पडणार आहे. यामध्ये आकलन कृती, व्याकरणाधारित कृती, अभिव्यक्ती अशा प्रकारच्या कृ ती असणार आहेत.
इयत्ता नववीची प्रचलीत भाषा विषयांची पाठ्यपुस्तके बदलणार नाहीत. त्या पाठ्यपुस्तकातील घटक, स्वाध्याय व उपक्रम यावर आधारित कृतिपत्रिका स्वरुपात मूल्यमापन असणार आहे. त्यासाठी पूरक साहित्य म्हणून कृती पुस्तिका नमुना कृती पत्रिका व नमुना उत्तरपत्रिका लवकर तयार होणार आहेत.
याबाबत संबंधित विषयांच्या शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. याप्रकारे ८० गुणांची लेखी परीक्षा असून, २० गुणांच्या तोंडी परीक्षेमध्ये कोणताही बदल असणार नाही. मूल्यमापन योजना काटेकोरपणे अंमलात आणण्याची सर्व जबाबदारी मुख्याध्यापकांची राहील, असे पाटील यांनी सांगितले आहे.
अभ्यास मंडळाने केलेला बदल स्तुत्य आहे. यामुळे आता विद्यार्थ्यांना वाचन व आकलन करावे लागणार आहे. पाठांतर करुन उत्तरे लिहिण्याच्या सवयीमुळे विद्यार्थ्यांची वाचन क्षमता कमी झाली होती. आता संपूर्ण पाठ समजून घेतल्याशिवाय तो कृ ती सांगूच शकणार नाही. निश्चितच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत मिळणार आहे.
- कल्पना तुमलाम,
मराठी शिक्षिका, आदर्श विद्यामंदिर, वाटूळ