सर्व बंधाऱ्यांची ‘क्रॉस चेकिंग’
By Admin | Updated: August 21, 2014 00:30 IST2014-08-20T21:52:18+5:302014-08-21T00:30:05+5:30
संदेश सावंत : जिल्हा परिषद कृषी समिती सभेत प्रश्नांचा भडीमार

सर्व बंधाऱ्यांची ‘क्रॉस चेकिंग’
सिंधुदुर्गनगरी : राज्य शासनाच्या जिल्हा अधीक्षक कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, पाणी साठवणुकीसाठी बांधलेले सिमेंट व माती बंधारे यासह विविध प्रकारच्या योजनांबद्दल समिती सदस्यांनी संशय व्यक्त केला. योजनांची प्रचार प्रसिद्धी न करता सर्व योजना या थातूर मातूर पद्धतीने राबवित असल्याचा आरोप करत सर्व बंधाऱ्यांची ‘क्रॉस चेकिंग’ करणार असल्याची माहिती जिल्हा परिषद उपाध्यक्ष व कृषी समिती सभापती संदेश सावंत यांनी दिली.
दरम्यान, या प्रकरणी राज्यशासनाच्या कृषी विभागाचे अधिकारी एस. आर. गोरे यांना समिती सभापती संदेश सावंत यांच्यासह सदस्यांनी योजनांबद्दल प्रश्नांचा भडीमार करत धारेवर धरले.
जिल्हा परिषदेची कृषी समिती सभा बॅ. नाथ पै सभागृहात सभापती संदेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी समिती सदस्य नासीर काझी, योगिता परब, दिलीप रावराणे, गुरुनाथ पेडणेकर, रेश्मा जोशी, समिती सचिव व कृषी विकास अधिकारी एस. एन. म्हेत्रे, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.
शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. काही निवडक शेतकऱ्यांनाच राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत लाभ दिला जातो. फळपीक विमा योजनेची माहिती वेळेवर न दिल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा योजनांपासून वंचित रहावे लागते. या एक ना अनेक प्रश्नांची सरबत्ती करत अधिकारी गोरे यांना धारेवर धरले. कृषी अधिकाऱ्यांकडून कोणतीही माहिती दिली जात नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. यावर संदेश सावंत आक्रमक होत आपण सर्व सदस्यांच्या मताशी सहमत असल्याचे सांगत सर्व योजना थातूर मातूर असल्याचेही सांगितले.
जिल्ह्यात चार तालुक्यात भात पिकाबरोबरच तूर लागवड करण्यात आली असून वैभववाडी तालुक्यात ५६२ किलो तुरीचे वाटप करण्यात आले आहे. याचा दोन ते अडीच हजार शेतकऱ्यांना लाभ दिला गेला असल्याचे सांगण्यात आले. मात्र ही बाब संशयास्पद असून तूर लागवडीची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आदेश सभेत देण्यात आले.
जिल्ह्यात ७०० ग्रॅमचे ११६९ भाजीपाला किटचे वाटप करण्यात आले असून चवळी, भेंडी, मुळा, मेथी, मिरची यासह भाजीपाल्याचे २०० रुपये प्रतिकिट कृषी विभागात उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १५ हजार ६०० मेट्रीक टन खतापैकी १३ हजार ४०० मेट्रीक टन खताची विक्री करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली.
अभिनंदनाचा ठराव
यावर्षीच्या शेतीविषयक हंगामात खते व बियाण्यांच्या बाबतीत बोगस बाब आढळून आली नाही. याबद्दल सदस्य नासीर काझी यांनी सभापती संदेश सावंत यांचा अभिनंदनाचा ठराव मांडला. (प्रतिनिधी)