मारहाणप्रकरणी शिवसैनिकावर गुन्हा
By Admin | Updated: October 8, 2014 22:59 IST2014-10-08T22:14:05+5:302014-10-08T22:59:57+5:30
काँग्रेस कार्यकर्त्याला रामगडात मारहाण

मारहाणप्रकरणी शिवसैनिकावर गुन्हा
आचरा : रामगड बाजारपेठ येथे नाथ मालंडकर यांच्या घरात काँग्रेस प्रचारासंदर्भात चर्चा करीत असताना राष्ट्रीय युवक काँग्रेस रत्नागिरी सिंधुदुर्गचे उपाध्यक्ष दीपक यशवंत सांडव यांना शिवसेना कार्यकर्ते दीपक कृष्णा राऊळ (रा. निरोम) यांनी अनधिकृतपणे घरात घुसून शर्ट फाडून, हाताच्या ठोशाने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना बुधवारी ११.३० वाजताच्या सुमारास रामगड बाजारपेठ येथे नाथ मालंडकर यांच्या घरात घडली.
या घटनेची तक्रार दीपक सांडव यांनी आचरा पोलीस ठाण्यात दाखल केली असून दीपक राऊळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीपक सांडव व त्यांच्यासोबत सुनिल घाडीगांवकर, सतीश परुळेकर, नाथ मालंडकर हे नाथ मालंडकर यांच्या घरी काँग्रेस प्रचाराची चर्चा करीत असताना दीपक राऊळ यांनी घरात घुसून ‘तुम्ही शिवसेनेच्या विरोधात प्रचार करायचा नाही, तुमचे बघून घेईन’ अशी धमकी दिली. त्यावेळी दीपक सांडव यांनी तुम्ही तुमच्या पक्षाचा प्रचार करा. आम्ही आमचे बघू असे सांगितले असता दीपक राऊळ यांनी दीपक सांडव यांची शर्टाची कॉलर पकडून ठोशाने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली व निघून गेले.
या घटनेची तक्रार दीपक सांडव यांनी आचरा पोलीस ठाण्यात दाखल केल्यानंतर दीपक राऊळ यांच्यावर जबरदस्तीने घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)
धमकी दिल्याप्रकरणी तक्रार दाखल
किर्लोस येथील व्यावसायिक व शिवसेना कार्यकर्ते प्रशांत नामदेव सावंत यांना काँग्रेस कार्यकर्ते राजेश हाटले यांनी दूरध्वनीवरून धमकावल्याची तक्रार आचरा पोलीस ठाण्यात प्रशांत सावंत यांनी दिली आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी ५.४० वाजताच्या सुमारास घडली. शिवसेना कार्यकर्ते प्रशांत सावंत यांना काँग्रेस कार्यकर्ते राजेश हाटले यांनी फोन करून ‘मी तुला भेटायला बोलावले. तू का नाही आलास? तुला भेटायचं नसेल तर तुला १९ तारीखला दाखवतो’ अशी धमकी फोनवरून दिल्याची तक्रार प्रशांत सावंत यांनी आचरा पोलीस ठाण्यात काँग्रेस कार्यकर्ते राजेश हाटले यांच्या विरोधात दिली आहे.