सी वर्ल्डसाठी पर्यायी जागा तयार
By Admin | Updated: November 2, 2015 00:24 IST2015-11-01T22:26:36+5:302015-11-02T00:24:05+5:30
प्रमोद जठार : जलचेतना परिषद जानेवारीत

सी वर्ल्डसाठी पर्यायी जागा तयार
कणकवली : सी-वर्ल्ड आता कोणा एकट्याच्या प्रतिष्ठेचा मुद्दा राहिलेला नाही. ती सिंधुदुर्गच्या प्रतिष्ठेची बाब आहे. कोणत्याही परिस्थितीत सीवर्ल्ड जिल्ह्याबाहेर जाऊ देणार नसून मालवणवासीयांना तो नको असेल तर पर्यायी जागा तयार आहे, असे माजी आमदार प्रमोद जठार यांनी येथील पत्रकार परिषदेत सांगितले. अमेरिकेतील ओरलॅँडो येथील सीवर्ल्डची पाहणी आगामी अमेरिका दौऱ्यात करणार असल्याचेही ते म्हणाले.
जठार म्हणाले की, पुढील काही दिवसांत अमेरिकेतील फ्लोरिडा-ओरलॅँडो येथील सी-वर्ल्ड प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी जाणार आहे. त्याचबरोबर तेथील नासा सेंटर, डिस्ने लॅँड, युनिव्हर्सल स्टुडिओ आदी ठिकाणांची पाहणी करणार आहे. तोंडवळी येथे होणारा सी-वर्ल्ड प्रकल्प हा जिल्ह्याचे चित्र पालटून टाकेल. हा प्रकल्प सिंधुदुर्गात कोणत्याही किनाऱ्यावर होऊ दे. त्यात जिल्ह्याचे भवितव्य आहे. मात्र, तो सिंधुदुर्गातून जाणार नाही याची आपण हमी देतो. त्यासाठी पर्यायी जागेची पाहणी करून ठेवण्यात आली असून त्याबाबत मुख्यमंत्र्यांनाही माहिती दिलेली आहे. मुख्यमंत्र्यांनीही त्याला मंजुरी दिलेली आहे. जागेच्या प्रश्नामुळे आताच्या प्रकल्पाला कुठलीही परवानगी अद्याप मिळालेली नाही. भूसंपादनाशिवाय सामंजस्य कराराने जागा मिळवण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.
सी वर्ल्डसाठी मेट्रो
सी वर्ल्डच्या आराखड्यात मेट्रोचा समावेश असून चिपी विमानतळापासून ही मेट्रो सी वर्ल्डपर्यंत जोडली जाणार आहे. गोव्यातील मोपा ते चिपी आणि चिपी ते सी वर्ल्ड असे सर्किट तयार झाल्यास येथील परिसराचा झपाट्याने विकास होईल.
सागरी महामार्ग केंद्राकडे
सध्याचा सागरी महामार्ग राष्ट्रीय महामार्ग होण्याच्या मार्गावर असून तसा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. सागरी राष्ट्रीय महामार्ग दुपदरी असेल. प्रत्येक पाच किलोमीटरवर एक मोटेल असेल. किनाऱ्याकडे जाणारे रस्ते प्रशस्त होतील. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांसाठी प्रत्येकी ५०० कोटी अशी १५०० कोटींची तरतूद या मार्गासाठी करण्यात येणार असल्याची माहिती जठार यांनी दिली.
सेनेबाबत अपशब्द नाही
सध्या शिवसेना-भाजपातील वाद विकोपास गेल्याबाबत छेडले असता जठार म्हणाले की, जोपर्यंत युतीचे सरकार आहे तोपर्यंत सिंधुदुर्गात कोणत्याही भाजप कार्यकर्त्याने शिवसेना कार्यकर्त्यांबाबत अपशब्द काढू नये, नाहीतर लोक आपणास हसतील.
येत्या ५ नोव्हेंबर रोजी कणकवलीत होणारी जलचेतना परिषद जानेवारी महिन्यात होणार आहे. या परिषदेसाठी येणारे जलपुरूष डॉ. राजेंद्र सिंह महिनाभराच्या कालावधीसाठी परदेश दौऱ्यावर गेले असल्याने परिषद पुढे ढकलण्यात आल्याची माहिती जठार यांनी
दिली. (प्रतिनिधी)