सावंतवाडी : आरोंदा येथील खाडीपात्रात बेकायदा वाळू उपसा करणार्या वाळू तस्करांना आज, मंगळवारी महसूल व पोलिस प्रशासनाने दणका दिला. या कारवाईत तब्बल सात बोटी ताब्यात घेतल्या तर एक बोट जाळून टाकण्यात आली. याप्रकरणी दोघा परप्रांतीय कामगारांना ताब्यात घेण्यात आले आहे.तसेच कांदळवनात असलेली झोपडीला नष्ट करण्यात आली आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून अन्य काही जण पळून गेले. ही कारवाई सावंतवाडी तहसिलदार अरुण उंडे यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी पोलिसांनी केली. दरम्यान या बोटी नेमक्या कुणाच्या? याची चौकशी सुरू असून बोटी मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसिलदार उंडे यांनी सांगितले.आरोंदा येथील खाडीत गोव्यातील काही लोकांकडून बेकायदा वाळू उपसा केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार उंडे यांनी सावंतवाडी पोलिसांना मदतीने त्या ठिकाणी पहाटेच्या सुमारास छापा टाकला. यावेळी आठ बोटी आढळून आल्या. त्यातील एक बोट जाळून टाकण्यात आली असून उर्वरित सात बोट ताब्यात घेण्यात आल्या आहेत. तसेच याप्रकरणी दोघा परप्रांतीय कामगारांना ताब्यात घेण्यात आले आहे.गेले अनेक दिवस वाळू तस्करीच्या तक्रारी होत्या. त्यानुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र संबधितांच्या बोटीत वाळू आढळली नाही तर बाजूला वाळूचा मोठा साठा आढळून आला आहे. तो ताब्यात घेण्यात आला असून ही वाळू नेमकी कोणाची? बोटी कोणाच्या? याची चौकशी करण्याची मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे, असे उंडे म्हणाले. या कारवाईत मंडळ अधिकारी विनायक कोदे, गुरूनाथ गुरव, तलाठी पास्ते कविटकर गावडे, खान मुळीक, नागराज गोरे, पाटोळे तसेच पोलिस उपनिरीक्षक आनंद यशवंते आदीनी सहभागी झाले होते.
Sindhudurg: आरोंदा खाडीपात्रातील वाळू तस्करांना दणका; एक बोट जाळली, सात बोटी ताब्यात
By अनंत खं.जाधव | Published: April 04, 2023 6:03 PM