न्यायालयाची प्रतीक्षा संपली
By Admin | Updated: February 26, 2015 00:06 IST2015-02-25T23:01:24+5:302015-02-26T00:06:09+5:30
इमारतीचे काम पूर्ण : दोडामार्गमधील न्यायालयीन काम होणार सोयीस्कर

न्यायालयाची प्रतीक्षा संपली
वैभव साळकर - दोडामार्ग - ‘तालुका तेथे न्यायालय’ या शासनाच्या धोरणानुसार दोन वर्षांपूर्वीच बांधून पूर्ण झालेल्या सुसज्ज अशा दोडामार्ग न्यायालयाच्या उद्घाटनाची प्रतीक्षा आता संपली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अनिल जोशी व जिल्हा सत्र न्यायाधीश सुनील कोतवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत २८ फेब्रुवारीला उद्घाटन होणार असून, प्रत्यक्षात ‘आॅर्डर...आॅर्डर...’ असा आवाज २ मार्चपासून दोडामार्ग तालुक्यातील या न्यायालयात घुमणार आहे. विशेष म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुका न्यायालयातील अद्वितीय अशी इमारत असून तिचे बांधकाम दर्जेदार व पुढील पन्नास वर्षांचा विचार करून करण्यात आले आहे.
युती शासनाच्या कालावधीत २७ जून १९९९ ला दोडामार्ग तालुक्याची निर्मिती झाल्यानंतर दोडामार्ग तालुका शासकीय कार्यालयांच्या प्रतीक्षेत होता. सुरुवातीला शासकीय गोदामात तहसीलदार कार्यालय सुरू केल्यानंतर इतर कार्यालये हळूहळू तालुका ठिकाणी सरू झाली खरी, मात्र, न्यायालयाची प्रतीक्षा काही संपली नव्हती. शासनाच्या ‘तालुका तेथे न्यायालय’ या धोरणानुसार चार वर्षांपूर्वी दोडामार्ग न्यायालयासाठी साधारपणपणे चार कोटी रुपयांच्या इमारतीला मंजुरी देण्यात आली. या इमारतीचे काम अरविंद देशपांडे व यशवंत आठलेकर यांनी दर्जेदार तसेच कमी कालावधीत पूर्ण करण्याची किमया केली. तालुक्यातील इतर शासकीय कामांच्या तुलनेत न्यायालयाचे काम कितीतरी उजवे असून, ते मॉडेल म्हणून पुढे आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायाधीश व सावंतवाडी तालुका न्यायाधिशांच्या देखरेखीखाली सार्वजनिक बांधकाम खात्याने दर्जेदार काम पूर्ण करून दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. साधारणपणे चार कोटीच्या या इमारतीचे बांधकाम पुढील पन्नास वर्षांचा विचार करून करण्यात आले आहे.
दोडामार्गसाठी स्वतंत्र न्यायालय झाल्याने सावंतवाडी न्यायालयात प्रलंबित असलेले येथील खटले लवकरात लवकर मार्गी लागण्यास मदत होईल. शिवाय जनतेला सावंतवाडीला जाण्यासाठी सहन करावा लागणारा मनस्तापही यामुळे कमी होण्यास मदत होईल.
- अॅड. प्रवीण नाईक,
वकील, दोडामार्ग
दोडामार्ग तालुक्याचे स्वतंत्र न्यायालय सुरु होणार असल्याने येथील जनतेला सहन करावा लागणारा त्रास वाचणार आहे. पूर्वी सावंतवाडीला जाण्यासाठी वेळ, पैसा व श्रम बरेच लागायचे मात्र, दोडामार्गला न्यायव्यवस्था आल्याने नक्कीच तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने ही एक जमेची बाजू असून जनतेसाठी फायदेशीर ठरणार आहे.
- जे. बी. सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक
तालुकास्तरीय न्यायालयात सर्वोत्कृष्ट
स्वतंत्र निवास व्यवस्था
दोन मजली इमारतीमध्ये एकूण बावीस हजार स्क्वेअर फिट बांधकाम करण्यात आले असून, त्यामध्ये दोन कोर्ट हॉल, कर्मचारी कार्यालये, स्टेनो रुम, लोक अदालत, लायब्ररी, मेडिएशन रुम, वकिलांसाठी महिला व पुरुष असे दोन वकील चेंबर, उपाहारगृह, न्यायाधिशांसाठी स्वतंत्र निवास व्यवस्था अशी रचना करण्यात आली आहे.
दोन वर्षांपूर्वीच पूर्ण झालेल्या न्यायालयाच्या इमारतीत प्रत्यक्षात कामकाज कसे सुरू होणार, याबाबत प्रतीक्षा होती. इमारत व निधीचे काम पूर्ण झाले असून आता शासनाने निधीची तरतूद व एक न्यायाधीश तसेच इतर चौदा कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे.