दोडामार्ग : कुडाशे वाणोशी येथे तिलारी नदीवरील गाळ काढून पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत चालू असलेल्या रस्त्यासाठी वापरण्यात येत आहे. डंपरने होणारी ही अवैध वाहतूक ग्रामपंचायतने दिलेल्या पत्रानुसार गाळ काढण्यास जलसंपदा विभागाने परवानगी दिली. मात्र, ठेकेदाराने रॉयल्टी न भरता महसूल व संबंधित विभागाच्या आशीर्वादाने गोलमाल चालला असल्याची तक्रार ग्रामस्थांनी प्रांत अधिकारी यांच्याकडे केली. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या दोडामार्ग महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यानी घटनास्थळी जाऊन पंचनामा करत वाहतूक रोखली.तिलारी नदीचा प्रवाह कुडासे गावातून वाहतो. येथे नदीवर कुडासे गावात ये-जा करण्यासाठी पूर्वी छोटा पूल बांधण्यात आला. मात्र या पुलाच्या वरच्या बाजूस दोन वर्षापूर्वी मोठा पूल बांधण्यात आल्याने या पुलावरील वाहतूक कमी झाली आहे. पावसाळ्यात नदीच्या पुरामुळे या पुलावर रेवाळ व छोटे दगड यांचा गाळ भरला आहे.
हा गाळ काढून पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत चालू असलेल्या रस्त्यासाठी वापरण्यात यावा असे ग्रामपंचायतने लेखी पत्र जलसंपदा सहाय्यक अभियंता यांच्याकडे दिले. तसे सहाय्यक अभियंता यांनी महसूल विभागाला अंधारात ठेऊन संबंधित ठेकेदाराला गाळ उपसा करण्याची पत्राद्वारे परवानगी दिली. मात्र ठेकेदाराकडून रॉयल्टी न भरता गाळ उपसा करण्यात येत होता.
ही बाब ग्रामस्थांच्या दर्शनास येताच याबाबत आक्रमक भूमिका घेत गुरुवारी होणारी अवैध वाहतूक ग्रामस्थांनी रोखली. याबाबतची तक्रार प्रांतधिकारी यांच्याकडे केली. ग्रामस्थांच्या या तक्रारीनुसार दोडामार्ग महसूल विभाग खडबडून जागे झाले. गुरुवारी महसूल विभागाचे कर्मचारी घटनास्थळी हजर होऊन अवैधरित्या वाहतूक चालू असलेले डंपरवर कार्यवाही करत गाळ नदी पात्रातच खाली केले.
या प्रकरणात आर्थिक गोलमाल होत असल्याची शक्यता ग्रामस्थांनी वर्तविली आहे. त्यासंबंधी कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वानोशी व सासोली जोड रस्ता करण्याचे काम चालू आहे. रस्त्याच्या पहिल्या थरावर खडी ऐवजी नदीतील गाळ उपसा करून त्याचा थर घालण्यात येत आहे.
त्यामुळे लाखो रुपयांचा फायदा ठेकेदाराला होणार असून अंदाजपत्रक व प्रत्यक्ष कामात तफावत असल्याने या प्रकरणात संबंधिताची मिलीभगत असल्याचे बोलले जात आहे. प्रकरण चिघळले असता महसूल विभागाचे तलाठी व अन्य कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.