होड्यांच्या फिटनेस प्रमाणपत्रावरून वादंग

By Admin | Updated: September 7, 2014 23:21 IST2014-09-07T22:39:58+5:302014-09-07T23:21:13+5:30

कारवाई : व्यावसायिक व बंदर विभाग आमनेसामने

The controversy over the boat's fitness certificate | होड्यांच्या फिटनेस प्रमाणपत्रावरून वादंग

होड्यांच्या फिटनेस प्रमाणपत्रावरून वादंग

मालवण : पर्यटन हंगाम सुरू झाल्याने आज, रविवारी सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना मालवण बंदर जेटीवरून किल्ला दर्शनासाठी घेऊन निघालेल्या किल्ला प्रवासी वाहतूक होडीला मालवण बंदर विभागाने होडीचे फिटनेस प्रमाणपत्र नसल्याच्या कारणास्तव अडवून दंडात्मक कारवाई केली. या घटनेवरून होडी व्यावसायिक व बंदर विभाग यांच्यात वादंग निर्माण झाला. दरम्यान, संतप्त होडी व्यावसायिकांनी दंड भरण्यास नकार देत आम्ही फिटनेस प्रमाणपत्र तसेच इतर आवश्यक प्रमाणपत्रांसाठी पूर्वीच लेखी पत्र दिले होते, त्याचे काय झाले? असा प्रश्न केला.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करीत पर्यटन हंगाम १ सप्टेंबरला सुरू होऊनही सुरक्षेच्या कारणास्तव आठवडाभर बंद ठेवून सहकार्य केले, तसे आम्हाला आवश्यक प्रमाणपत्र देऊन तुम्ही सहकार्य का करीत नाही, असा जाब विचारला, यामुळे फिटनेस प्रमाणपत्रावरून होडी व्यावसायिक व बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये वादंग झाला. दरम्यान, याबाबत मालवणचे सहायक बंदर निरीक्षक चिखलीकर यांनी मंगळवारी (दि. ९) प्रादेशिक बंदर अधिकारी व होडी व्यावसायिक यांची बैठक होणार असून, होड्यांच्या तपासणीबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगितले. या पार्श्वभूमीवर आज होडी व्यावसायिक संजय आढाव पर्यटक प्रवाशांना घेऊन किल्ला दर्शनासाठी निघाले. तेव्हा बंदर अधिकाऱ्यांनी फिटनेस प्रमाणपत्रावरून आढाव यांना ११०० रुपये दंडात्मक कारवाई केली. तेव्हा संतप्त होडी व्यावसायिकांनी दंड भरण्यास नकार दिला.

आरोप-प्रत्यारोप
सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूक करणाऱ्या होडी व्यावसायिकांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सुरक्षाविषयक अटी व नियमांची माहिती देण्यासाठी दोन सप्टेंबरला प्रादेशिक बंदर अधिकारी
कॅ. व्ही. एच. इंगळे यांची होडी व्यावसायिकांसोबत बैठक घेतली.
या बैठकीत कॅ. इंगळे यांनी यावर्षीच्या हंगामात नोंदणीकृत होड्यांची फिटनेस व क्षमतेची चाचणी झालेल्या आणि परवाना नूतनीकरण केलेल्या होड्यांनाच पर्यटन व्यवसायात सहभाग घेता येईल, तसेच प्रत्येक बोटीवर लाईफ जॅकेट बंधनकारक असल्याचे सांगितले होते. यावेळी फिटनेस प्रमाणपत्राबात होडी व्यावसायिकांनी बंदर अधिकाऱ्यांना कोंडीत पडकले होते.
हिरमोड झाल्याने पर्यटक परत
होडी व्यावसायिक व बंदर विभाग यांच्यातील वादावादीमुळे किल्ला होडी वाहतूक बंद राहिली. रविवारी सुटी असल्याने सिंधुदुर्ग किल्ला दर्शनासाठी आलेल्या पर्यटकांचा हिरमोड झाला.

आम्ही सहकार्य करतो, परंतु तुम्ही का करीत नाही.
- मंगेश सावंत, अध्यक्ष, होडी व्यावसायिक संघटना
होडींच्या फिटनेस प्रमाणपत्रासाठी लेखी प्रस्ताव द्या. होड्यांच्या तपासणीसाठी मंगळवारी प्रादेशिक बंदर अधिकाऱ्यांशी होडी व्यावसायिकांची बैठक होईल. पूर्तता नसल्यास वाहतूक बंद ठेवावी.
- चिखलीकर, सहायक बंदर निरीक्षक.

Web Title: The controversy over the boat's fitness certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.